प्रवाशांची गैरसोय : उसळलेल्या गर्दीमुळे आरक्षण नाहीचगोंदिया : दिवाळी हा आनंदाचा उत्सव. बाहेरगावी नोकरी करणारे लोक या उत्सवासाठी घरी ़जातात. सध्या दिवाळी संपली आहे. सुट्या सुरू झाल्या असून अनेकांना आपापल्या ठिकाणी येण्या-जाण्याचे वेध लागले आहे. कित्येकांनी प्रवासाचे बुकिंग करून ठेवले आहे. त्यामुळे रेल्वे, एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तब्बल महिनाभर आरक्षण नसल्याचे चित्र आहे. दिवाळी आपापल्या कुटुंबीयासमवेत साजरी करण्यासाठी बाहेरगावी नोकरी, व्यवसाय किंवा खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले आपल्या गावाकडे परत गेले होते. आता दिवाळीचा आनंद घेऊन ते परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्या दृष्टीने प्रवासाचे नियोजन दिवाळीपूर्वीच केले जाते. गेल्या तीन दिवसांपासून रेल्वे व बसस्थानकावर एकच गर्दी उसळली आहे. खासगी बसचे प्रवासदर हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे रेल्वेचे बुकिंंग हाऊसफुल झाले असून वेटिंगचेही वांदे आहे. गोंदियावरून नागपूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. गत आठवड्यापासून एसटीने व्यवसायात उचल खाल्ली आहे. वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता नागपूरकडे जाण्यासाठी एसटीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या तिकीट दरापेक्षा खासगी बसचे दर तिप्पट आहेत. प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे खासगी बसवाले हे पैसे लुटत असल्याचा सूर प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. खासगी बसगाड्या प्रशस्त व निमआरामाच्या असल्यामुळे बहुतांश प्रवासी एसटीने प्रवास करणे टाळत आहेत. अनेक खासगी बसगाड्यांच्या थांब्यावर प्रवाशांची झुंबड पहावयास मिळाली. दिवाळीसाठी लोकांचा प्रवास गेल्या आठ दिवसांपासून सुरू झाला असून तीन दिवसांत प्रवाशांची गर्दी कमालीची दिसत आहे. त्यामुळे एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानक प्रवाशांनी तुडुंब भरले आहे. एसटीच्या तुलनेत रेल्वे आरक्षणसुद्धा महिनाभर हाऊसफुल आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, हावडा, चैन्नई आदी महत्त्वपूर्ण शहरांकडे जाण्यासाठी आरक्षण मिळेनासे आहे. अनेकांनी दिवाळीला येण्यापूर्वीच परतण्याचे सुद्धा रेल्वे आरक्षण केले आहे. मात्र वेळेवर आरक्षण करणाऱ्यांची गोची झाली असून घराकडे परतणे आवश्यक असल्यामुळे आहे त्या परिस्थितीत जाणे पसंत करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
रेल्वे, एस.टी ‘हाऊसफुल’
By admin | Updated: October 26, 2014 22:41 IST