काचेवानी : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याची माहिती पालकांपासून ते जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी तिरोडा शिक्षण विभागाने चित्ररथ यात्रा काढून जनजागृती केली.सर्व शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक सत्र २०१४-१५ मध्ये लोकजागृतीतून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ ची अंमलबजावणी करण्यात आली. सर्व स्तरावर माहिती उपलब्ध करण्याकरिता गटसाधन केंद्रस्तरावर चित्ररथाचे आयोजन करण्यात आले. चित्ररथ कार्यक्रमाला पं.स. चे सभापती ललिता जांभूळकर, उपसभापती टुंडीलाल शरणागत यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथाला रवाना केले. यावेळी पं.स. चे खंडविकास अधिकारी एन.आर. जमईवार, गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. चित्ररथाव्दारे शिक्षण हक्क कायद्यातील विविध तरतुदी आणि पालकांच्या हक्कासंदर्भात माहिती सर्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी आणि २५ टक्के प्रवेशाबाबतच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन ‘सिटी सन ग्रुप’ च्या कलापथकाव्दारे करून प्रचार व प्रसार करण्यात आला. चित्ररथ कलापथकाची सुरूवात पं.स. तिरोडा येथून करण्यात आली. जि.प. उत्तर बुनियादी शाळेत कलापथकाव्दारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी गिरजाबाई कन्या हायस्कूल तिरोडा व जि.प. उच्च प्राथमिक शाळा मांडवी येथे सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती गावातील व परिसरातील नागरिकांना देण्यात आली. तिरोडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांच्या निर्देशनात व नेतृत्वात चित्ररथ यात्रा काढण्यात आली. त्यासाठी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पी.पी. समरीत, डी.बी. साकुरे व ए.सी. शहारे, गटसमन्वयक डी.आय. खोब्रागडे, विषयतज्ञ ब्रजेश मिश्रा, प्राग ठाकरे, नरेंद्र बारेवार, डी.जी. हरडे, प्रतिभा लांडगे, शालिनी कुंजरकर, ज्योती पारधी, लेखा सहायक ज्योती बघेले, आशा मासरकर, विषयतज्ज्ञ प्रमोद खोब्रागडे आणि परिचर एस.के. गोंधुळे यांचे सहकार्य मोलाचे ठरले.कार्यक्रमासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले. चित्ररथ यात्रेत अनेक शाळांतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. (वार्ताहर)
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाबाबत जनजागृती
By admin | Updated: September 3, 2014 23:30 IST