आमगाव : नगर परिषदेची स्थापना झाल्यापासून चार-पाच वर्षे झाली, पण हाताला काम नसल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने हाताला काम द्यावे, अन्यथा १५ फेब्रुवारीपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी तहसीलदारांना दिला आहे.
आमगाव नगर परिषदेची स्थापना २ ऑगस्ट २०१७ रोजी करण्यात आली आहे. नगर परिषद परिक्षेत्रात आमगाव, बनगाव, रिसामा, कुंभारटोली, बिरसी, पद्मपूर, किडंगीपार व माल्ही या गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु फेब्रुवारी २०१५ पासून नगर पंचायत ते नगर परिषद अशा विवादात प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्य सुरू आहे. यात मात्र नागरिकांचा नाहक बळी घेतला जात आहे. जानेवारी २०१६ मधील शासन निर्णयाप्रमाणे मजुरांना राज्य रोजगार हमी योजनेत काम उपलब्ध करून देणे आवश्यक होते. परंतु प्रशासन व शासनाच्या दिरंगाईमुळे स्थानिक लोकांना रोजगार हमी योजनेची कामेच मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. यामुळे नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावातील कामगारांना रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्यात यावीत तसेच इतर मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांच्या नेतृत्वात नगर परिषद ते तहसील कार्यालयात आक्रोश रॅली काढून मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात कामगारांना रोहयोतून कामे उपलब्ध करून द्या, जॉब कार्ड बनवून द्यावे, घरकुलाकरिता तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात यावे, शासन मंजूर आठ कोटीची कामे सुरू करावी, नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, परिक्षेत्रातील नाली-रस्ते बांधकामांना मंजुरी द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी तहसीलदार दयाराम भोयर यांनी प्रशासनाकडे मागण्यांचा तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना मानकर, उत्तम नंदेश्वर, पुरुषोत्तम बोहरे, तारा मेंढे, द्वारका शेंडे, लक्ष्मी भांडारकर यांच्यासह अन्य कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.