गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकात प्रवाशांना होणाऱ्या असुविधा लक्षात घेऊन त्वरित यावर उपाययोजना करून सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी गोंदिया रेल्वे स्टेशन सल्लागार समितीने केली आहे. यासंदर्भात रेल्वे व्यवस्थापक विकासकुमार कश्यप यांना निवेदन देण्यात आले.
कुडवा ते पाल चौककडे जाणारा पादचारी पूल प्रवाशांसाठी व शहरवासीयांना त्वरित सुरू करण्यात यावा, मुख्य बाजार ते रेलटोलीकडे जाणारा पादचारी पूल त्वरित सुरू करण्यात यावा, गोंदिया ते कोल्हापूर जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये पूर्वीप्रमाणे दुग्ध व्यावसायिकांकरिता विशेष डब्याची व्यवस्था करण्यात यावी. रेल्वे स्थानक गोंदियाकडे येणाऱ्या रस्त्यांवर दिशा निर्देशक बोर्ड लावण्यात यावे, शहरातील नागरिक व प्रवाशांना होणाऱ्या असुविधेकडे लक्ष देऊन त्वरित यावर कारवाई करून निराकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन गोंदिया रेल्वे स्टेशन सल्लागार समितीने व्यवस्थापक विकासकुमार कश्यप यांना दिले. शिष्टमंडळात दिव्या भगत-पारधी, सूरज नशिने, लक्ष्मण लधानी, राजेंद्र कावळे यांचा समावेश होता.