सालेकसा : प्राध्यापकांच्या अनेक मागण्या अनेक वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यावर कोणताही निर्णय शासन घेत नाही. राज्य शासनाच्या या आडमुठे धोरणाविरूद्ध प्राध्यापक महासंघाचे २१ जुलै रोजी मुंबईत जेल भरो आंदोलन पार पडले. या आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील १०० प्राध्यापकांचा सहभाग होता. यावेळी विरोधी पक्षनेते विनोद तावाडे यांनी महासंघाला मार्गदर्शन करून प्राध्यापकांच्या मागण्या नवीन सत्ता स्थापनेनंतर त्वरीत पूर्ण करू, असे आश्वासन दिले.आजपर्यंत उच्च व सर्वोच्च न्यायालयाने नेट-सेट, ग्रॅज्युईटी, कुंठीत वेतनवाढ, निवड श्रेणी नंतरची १४,९४० प्रकरणे, समाजकार्य, आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापकांचे प्रश्न, युजीसीने नेट-सेट मुक्त केलेल्या प्राध्यापकांना सहा महिन्यात कॅश लागू करण्यासंबंधीचा दिलेला अंतिम आदेश, उच्च न्यायालयाने १० मे २०१३ व १७ आॅक्टोबर २०१३ चा दिलेला निर्णय शिक्षकांच्या बाजूचे असूनही त्यावर काहीच कार्यवाही न करणे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे अशा प्रश्नांवर राज्य सरकारची भूमिका प्राध्यापकांबद्दल द्वेषपूर्ण राहिलेली आहे.अनेकदा प्राध्यापक महासंघाने आंदोलन करुन समस्या सोडविण्यासाठी अर्ज, निवेदने दिली. परंतु राज्य सरकारच्या आडमुठे धोरणामुळे व तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या दुराग्रही स्वभावामुळे प्राध्यापकांच्या प्रश्नांवर चर्चा न होता प्रलंबित ठेवण्यात आलेल्या आहेत. तेव्हा उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयानंतरही कोणताही निर्णय न घेणारे महाराष्ट्राचे सरकार घटनाबाह्य कारभार करीत असून ते तातडीने बरखास्त करावे, यासाठी आपला आंदोलनाचा कार्यक्रम प्राध्यापक महासंघाने जाहीर केला होता. त्यात २१ जुलै २०१४ रोजी मुंबई येथे जेलभरो आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले होते. ते आंदोलन यशस्वीपणे पार पडले. या जेलभरो आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील जवळपास १०० प्राध्यापकांचा सहभाग होता. आता दिल्ली येथे व जिल्हास्तरावरही कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे महासंघातर्फे सांगण्यात आले आहे. या जेलभरो आंदोलनात गोंदिया जिल्हा नुटाचे अध्यक्ष डॉ. अश्वीन चंदेल, सचिव डॉ. दिलीप जेना, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. एन.एम. हटवार, डॉ. छाया पटले, डॉ. ए.एम. गहाने, प्रा. बी.बी. परशुरामकर, विजय राणे, प्रा. व्ही.टी. गजभिये, प्रा. भूषण फुंडे, प्रा. ओ.आय. ठाकूर आदी सहभागी झाले होते. या आंदोलनात विरोधी पक्षनेते विनोद तावाडे, आ. विनायक देशपांडे, आ. रामभाऊ मोते, माजी आ. बी.टी. देशमुख यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)
प्राध्यापक महासंघाचे आंदोलन ठरले यशस्वी
By admin | Updated: July 27, 2014 23:50 IST