गोंदिया : टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा व संनियंत्रण समितीच्या सभेत करण्यात आले.याप्रसंगी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, आ. राजेंद्र जैन, आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. सदस्य राजेश चतुर, जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, जिल्हा भूजल व सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू वैज्ञानिक काझी प्रामुख्याने उपस्थित होते. सादरीकरणातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. मागील पाच वर्षांत ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांची निवड या अभियानात करण्यात आली. (प्रतिनिधी)अभियानांतर्गत करण्यात येणारी कामेया अभियानांतर्गत पाणलोट विकास कामे, साखळी सिमेंट काँक्रीट नाला बंधाऱ्यांची कामे, नाला खोलीकरण-रूंदीकरण, जुन्या जल संरचनांना पुनर्जीवित करणे, अस्तित्त्वातील लघु पाटबंधारे व साठवण बंधाऱ्यांची दुरूस्ती करणे, पाझर तलाव व लघु तलावांची दुरूस्ती व नुतणीकरण, क्षमता पुनर्स्थापित करणे, पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, माती नाला व बांधातील गाळ काढणे, मध्यम व मोठ्या प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापरासाठी उपाय योजना करणे, लहान ओढे-नाले जोड प्रकल्प राबविणे, विहीर-बोअरवेलचे पुनर्भरण करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, पाणी वापर संस्थांना बळकटीकरण करणे, कालव्यांची दुरूस्ती करणे आदी कामे या अभियानांतर्गत करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाचे सादरीकरण
By admin | Updated: February 12, 2015 01:22 IST