गोंदिया : महाराष्ट्र शासन गोंदिया जिल्ह्यासोबत सावत्रपणाची वागणूक करीत असल्याची ओरड नेहमीच होत असते. परंतु पोलीस विभागाने सतत पाठपुरावा केल्यामुळे चार महिन्यांपूर्वी मागणी करण्यात आलेल्या नवीन २५ वाहनांची पूर्ती महाराष्ट्र शासनाने दिवाळीच्या मुहुर्तावर केली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी जिल्हा पोलीस विभागाला भाग्याची लाभली आहे. जिल्हा नक्षलदृट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलवाद्यांना लढा देण्यासाठी पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस जीर्णावस्थेत असलेल्या वाहनांतून गस्त घालीत होते. पोलीसांचे वाहन कोठेही बंद पडायचे व त्यामुळे त्यांना आपले वाहन दुरूस्तीसाठी अनेकदा टाकावे लागत होते. विज्ञानाच्या आविष्कारात नक्षलवाद्यांकडे असलेली अत्याधुनिक साधने तसेच चोरीच्या घटना घडविणाऱ्यांकडेही आधुनिक संसाधने आहेत. मात्र त्या चोरांना पकडणाऱ्या व नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या पोलिसांकडे मात्र जुनेच वाहन होते. परिणामी घटनास्थळी वेळेत पोहोचणे पोलिसांना शक्य नव्हते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्यावेळी गोंदिया पोलिसांना उपलब्ध असलेल्या जून्या वाहनांचा त्रास झाला. काहीं अधिकाऱ्यांकडे तर वाहनेच नव्हती मात्र उपलब्ध असलेल्या वाहनांच्याच आधारे कारवाया पार पाडल्या जात होत्या. जिल्ह्यात वाहनांचा तुटवडा असल्यामुळे तत्कालीन पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप झळके यांनी गृहविभागाकडे वाहनांची मागणी केली. त्या मागणीच्या आधारे जिल्ह्याला २५ नवी वाहने देण्यात आली आहेत. या पैकी बरीचशी वाहने नक्षलग्रस्त भागात देण्यात आली आहेत. तर ज्या अधिकाऱ्यांची जीर्ण वाहने होती अशा अधिकाऱ्यांना काही वाहने देण्यात आली आहेत.गोंदिया, आमगाव, देवरी उपविभागीय अधिकारी, काही ठाणेदार व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे वाहन देण्यात आले आहेत. चार महिन्यांपूर्वी डॉ. झळके यांनी केलेली मागणी पुर्ण झाली. दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर मिळालेली वाहनांचीही भेट पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांनी नक्षलग्रस्त भागात व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना वितरीत केली. (तालुका प्रतिनिधी)
दिवाळीच्या मुहूर्तावर पोलिसांना मिळाले २५ वाहन
By admin | Updated: October 26, 2014 22:42 IST