गोंदिया : राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरुवात २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशभरात झाली आहे. या अभियानासाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता ग्रामीण व नागरी भागात नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांचा या अभियानात सहभाग मिळवावा, असे निर्देश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी सीईओ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालस्वास्थ अभियान व स्वच्छता अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी व मोहिमेमध्ये राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी टी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, प्र.पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भोयर उपस्थित होते.स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत शिंदे यांनी सांगितले की, योग्य नियोजन व सक्रीय सहभागातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येईल. या अभियानांतर्गत ७ ते १२ नोव्हेंबर दरम्यान गावपातळीवर स्वच्छता करण्यात येणार असून प्रथम सामुदायिक, सार्वजनिक व शालेय शौचालय व अंगणवाडी स्वच्छतागृहाची दुरुस्ती व वापर करण्यात यावा, तसेच येथे स्वच्छतेकरीता पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी.गावाची सार्वजनिक साफसफाई करण्याकरीता सकाळी ७ ते १० या ठराविक वेळेत स्वच्छता मोहिम राबवावी. मोहिमेचे स्वरुप व्यापक करण्याकरीता गावाचे सर्वेक्षण करणे, ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी असे त्यांनी सांगितले. गावपातळीवर स्वच्छता करण्याकरीता प्रत्येक गावाकरीता एक पथक करण्यात येणार असून त्यामध्ये विस्तार अधिकारी, पोलीस कर्मचारी, प्रमुख व विभागीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येईल. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी संबंधितांना स्वच्छतेबाबत निर्देश द्यावे व या मोहिमेमध्ये स्वत: सक्रीय सहभागी व्हावे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. कार्यालयीन परिसरातील भिंतीवर लावलेली स्टीकर्स, भिंतीपत्रके काढून भिंती स्वच्छ कराव्या. सूचना फलकाचा वापर करावा, कचरा करताना आढळणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ दंड स्वरुपात कारवाई करण्यासारख्या उपायाचा अवलंब करावा. ठिकठिकाणी स्वच्छता राखा असे सूचना फलक लावावे. आपले घर व आपल्या कार्यालयापासून स्वच्छतेची सुरुवात करण्यात यावी. यावेळी जि.प.च्या पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे अतुल गजभिये यांनी हात स्वच्छता धुण्याचे प्रात्याक्षित करुन दाखविले. सभेला तहसीलदार गोंदियाचे संजय पवार, गोरेगावचे डी.ए. सपाटे, आमगावचे राजीव शक्करवार यांच्यासह गटविकास अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
स्वच्छतेसाठी लोकसहभाग गरजेचा
By admin | Updated: November 6, 2014 22:57 IST