उषा मेंढे : वर्धिनी स्नेहसंमेलनाचा समारोपगोंदिया : ग्रामीण भागामध्ये रोजगारासोबत महिलांना आर्थिक शिस्त, हिशोबात पारदर्शकता, आरोग्य, शिक्षण, उत्तरदायित्व आणि सामाजिक जबाबदारीचे भान देणारी वर्धिनी जिल्ह्यात शाश्वत विकासाची उभारणी करीत आहे. त्यांचे हे कार्य प्रशंसनीय आहे, प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. महिला सक्षमीकरण करणाऱ्या वर्धिनी स्नेहसंमेलनाचा समारोप स्व. वसंतराव नाईक सभागृहात करण्यात आला. यावेळी अध्यक्षपदावरुन त्या बोलत होत्या. अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीवास्तव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, अतिरिक्त प्रकल्प अधिकारी प्रमोद घाटे, चंद्रपूर वर्धिनी चमूचे अमोल रोटिले व हिमाणी राजपूत उपस्थित होते.वर्धिनीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत बोलताना दिलीप गावडे यांनी महिलांनी आर्थिक उन्नतीसोबत स्वच्छतेचा जागरही करावा, अशी सूचना केली. आर्थिक बाबतीत संपूर्ण मदत बँकेद्वारे करण्यात येणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. या वेळी सोनिया वाढई, संगीता फुलबांधे, मालता गावड, वीणा वासनिक, कविता मेश्राम, देवांगणा भेंडारकर, रंजना शिवणकर, रागिनी रामटेके, अल्का मडावी आणि गणिता खोबा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.जिल्हा आरोग्य विभागाद्वारे वर्धिनीतील महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीन व रक्तगट तपासणी करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांनी मांडले. संचालन वैशाली खोब्रागडे यांनी केले. आभार गटसमन्वयक विजय भुरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
शाश्वत विकासाची वाटचाल प्रशंसनीय
By admin | Updated: February 8, 2016 01:57 IST