गोंदिया : येथील ७५ वर्षीय वृद्ध अयोध्याप्रसाद चौरसिया यांना निराधार योजनेंतर्गत पेन्शन मिळते. मात्र ती मिळवून घेण्यासाठी कार्यालयाचा चकरा माराव्या लागतात. सतत चकरा मारूनही त्यांना नोव्हेंबर २०१४ पासून आतापर्यंत पेन्शन देण्यात आली नाही. चौरसिया यांनी अनेकदा संबंधित कार्यालयाच्या चकरा मारल्या. पण कोणताही अधिकारी समाधानकारक उत्तर देत नाही. पेन्शनबाबत विचारणा करताच अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते व आपली पेन्शन आपल्या खात्यात जमा होईल असे सांगतात. मात्र सहा महिन्यांपासून पेन्शन जमा न झाल्याने ते सदर प्रकाराला गांभीर्याने घेत नाही. वृद्ध व्यक्ती अपंग असूनही त्याला आपल्या अधिकारासाठी मोठीच पायपीट करावी लागत आहे. वारंवार शासकीय कार्यालयात ये-जा करूनही व अधिकाऱ्यांना विनवण्या करूनही ते केवळ वेळ मारून नेतात. तर चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतात, असा त्यांचा आरोप आहे. याकडे लक्ष पुरवून त्वरित पेन्शन जमा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)
सहा महिन्यांपासून पेन्शनसाठी भटकंती
By admin | Updated: July 1, 2015 02:20 IST