गोंदिया : जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष पायबंद घालण्यासाठी जिल्ह्याच्या मुख्यालयी ‘आॅपरेशन सेल’ उघडण्यात आले आहे. हा सेल जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या पोलिसांना ‘निर्देश’ (डायरेक्शन) देण्याचे काम करणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी हे चार तालुके नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल आहेत. गोंदियात अधूनमधून पोलीस-नक्षल चकमकी होत असतात. गडचिरोलीच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा प्रभाव अत्यंत कमी असला तरी जिल्हा नक्षलवाद्यांचे ‘रेस्ट झोन’ म्हणून हा जिल्हा प्रसिध्द आहे. नक्षलवाद्यांना जिल्ह्याच्या सिमेत पाय ठेऊ देणार नाही या हेतूने जिल्हा पोलीस काम करीत आहेत. नक्षलवाद्यांच्या विरोधात जंगल सर्च मोहीम राबविणाऱ्या जवानांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच कोबींग आॅपरेशन करणाऱ्या जवानांना पोलीसांच्या पार्ट्या कुठे-कुठे आहेत याची माहिती देण्यासाठी हा सेल सूचना करणार आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या जवानांना आता या सेलमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जंगलात सी-६० पार्ट्या व कंपन्यांच्या जवानाचे पेट्रोलिंग सुरू असते. परंतु एक पोलीस पार्टी दुसऱ्या पोलीस पार्टीला नक्षलवाद्यांचा गट समजून त्यांच्यावर अचानक फायरींगही करू शकते. अशी घटना घडू नये म्हणून जंगलात फिरणाऱ्या एका पोलीस पार्टीची माहिती दुसऱ्या पोलीस पार्टीला देण्यासाठी हा ‘आॅपरेशन सेल’ मदत करणार आहे. या सेलमध्ये एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या सेल मधील मुख्य अधिकारी सर्व जंगलातील पार्ट्यांच्या प्रमुखाशी सतत संपर्कात राहणार आहेत. त्याची माहिती पोलीस अधिक्षकांपर्यंत पोहचविण्याचेही काम ते करतील. जंगलात असलेली कोणतीही पोलीस पार्टी क्षणाक्षणात घडलेल्या बाबींची माहिती या सेलला पुरवतील. एखाद्या क्षेत्रात नक्षलवाद्यांशी पोलीसांची चकमक सुरू झाली तर त्या पोलिसांच्या मदतीसाठी कोणती पार्टी पाठवायची. चकमक होत असलेल्या घटनास्थळाजवळ कोणती पोलीस पार्टी जवळ आहे त्या पार्टीला मदतीसाठी पाठविले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
नक्षल बीमोडासाठी ‘आॅपरेशन सेल’
By admin | Updated: January 22, 2015 01:32 IST