गोंदिया: चारही विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या जवळजवळ अर्धी आहे. मात्र उमेदवारी दाखल करून निवडणूक लढण्यात महिला वर्ग बराच मागे असल्याचे दिसून येते. निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ५४ उमेदवारांमध्ये केवळ ४ महिला उमेदवार आहेत. जिल्ह्यात चारही विधानसभा मतदार संघात एकूण १० लाख १८ हजार ५६८ मतदार आहेत. त्यात पुरूष मतदार ५ लाख १० हजार ९१६ तर महिला मतदार ५ लाख ७ हजार ६४६ आहेत. म्हणजेच जवळजवळ अर्धे मतदार महिला आहेत. मात्र त्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या मात्र अगदीच नगण्य आहेत. चारही मतदार संघात केवळ ४ महिला उमेदवार आहेत. विशेष म्हणजे चारही महिला उमेदवार वेगवेगळ्या मतदार संघातील आणि वेगवेगळ्या पक्षांच्या आहेत. महिला उमेदवारांना संधी देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय कॉम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने प्राधान्य दिले आहे. मात्र भाजपसारख्या मोठ्या पक्षाने एकाही महिला उमेदवाराला प्रतिनिधीत्व दिलेले नाही. तिरोडा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर यांना मैदानात उतरविले आहे. या मतदार संघातील त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. अर्जुनी मोरगाव मतदार संघातूनही शिवसेनेच्या तिकीटवर जि.प.सदस्य किरण कांबळे रिंगणात आहेत. त्यासुद्धा या मतदार संघात एकमेव महिला उमेदवार आहेत. गेल्यावेळीही त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. एक महिला म्हणून सहानुभूती मिळेल अशी आशा त्यांना वाटत आहे. गोंदियात भाकपाच्या करुणा गणवीर तर आमगाव मतदार मतदार संघात बसपाच्या शारदा उईके रिंगणात आहेत.
५४ उमेदवारांमध्ये केवळ चार महिला
By admin | Updated: October 9, 2014 23:05 IST