गोंदिया : मार्च महिन्यात केवळ १७ हजारांच्या आत असणारा कोरोनाबाधितांचा आकडा एप्रिल महिन्यात तब्बल २८ हजारांवर पोहोचला आहे. मागील २२ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने रुगसंख्येत वेगाने वाढ होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने शिरकाव झाल्याने आता आरोग्य यंत्रणासुध्दा तोकडी पडत आहे.
आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला जात होता. मात्र ही बाब कुणीही गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचेसुध्दा दुर्लक्ष झाले होते. मात्र हीच बाब आता प्रशासनाच्या अंगलट येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता यंत्रणेची धावपळ उडाली आहे. गुरुवारी (दि. २२) जिल्ह्यात ५८१ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ६६२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या ६६२ रुग्णांमध्ये सर्वाधिक ३७४ बाधित गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६५, गोरेगाव ११, आमगाव ७०, सालेकसा २३, देवरी ५०, सडक अर्जुनी २५, अर्जुनी मोरगाव ३३ आणि बाहेरील राज्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १२७०२९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०४६२२ नमुने निगेटिव्ह आले आहे, तर कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १२२४२७ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०७१६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २८३७५ कोरोनाबाधित आढळले असून, २१२३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ६७२६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ४२३५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..................
कोरोनावरील औषधांचा तुटवडा कायम
कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. मात्र त्यावरील औषधांचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. फॅबिफ्यू औषधासह इतर औषधे मिळणेसुध्दा कठीण झाले आहे. या औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट कायम आहे. तर दोन तीन दिवसांत या औषधांचा स्टॉक येणार असल्याचे औषध विक्रेते सांगत आहेत. मात्र या सर्व परिस्थितीमुळे रुग्ण दगाविण्याची शक्यता वाढली आहे.
............
प्रलंबित नमुन्यांची संख्या चार हजारांवर
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने नागरिक चाचणी करण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ४२३५ नमुने प्रलबित आहेत. अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने संसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.