कपिल केकत गोंदियाउन्ह पावसात घाम गाळून पीक काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा. तसेच धानाच्या मोजणीत काटा मारून त्यांची लूट होऊ नये याची खबरदारी घेत असलेल्या पणन महामंडळाने इलेक्ट्रीक काट्याने धानाची मोजणी करण्याचे निर्देश कृषी उत्पन्न बाजार समित्यांन दिले होते. महामंडळाच्या या आदेशाचे पालन करीत येथील बाजार समितीने २५ इलेक्ट्रीक काटे खरेदी केले आहे. त्यामुळे येथील बाजार समितीत आता इलेक्ट्रीक काट्यांनी धान मोजणी होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळावा, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी पणन महामंडळा सतत नजर ठेऊन राहते. तसेच महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या सुविधा व संरक्षणार्थ वेळोवेळी सूचनाही केल्या जातात. शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये व धानाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्यात सर्वत्र शासकीय धान खरेदी केंद्र उघडण्यात आले. मात्र केंद्र उघडून किंवा धान बाजार समित्यांत हमी भावाने विक्री करवून देण्याची सुविधा पुरेशी नाही. कारण धान खरेदी केंद्र म्हणा वा बाजार समित्या धानाची मोजणी करताना काटा मारूनही शेतकऱ्यांची लूट केली जाऊ शकते व तसले प्रकार घडतातही. ही बाब लक्षात घेत पणन महामंडळाने असल्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी बाजार समित्या व धान खरेदी केंद्रांवर इलेक्ट्रीक काट्याने धानाची मोजणी करण्याचे निर्देश दिले होते. महामंडळाचे हे निर्देश येथील कृषी उत्पन्न बाजार समितीलाही मिळाले. यावर बाजार समितीने १० डिसेंबर रोजी पार पडलेल्या मासीक सभेत इलेक्ट्रीक काटे खरेदीचा विषय मांडला. पणन महामंडळाकडून आलेल हा आदेश असल्याने त्याचे पालन करणे बंधनकारक होते व त्यादृष्टीने बाजार समितीने त्वरीत तसा प्रस्ताव पारीत केला. यावर बाजार समितीने सुमारे २.७५ लाख रूपये खर्च करून २५ इलेक्ट्रीक काटे खरेदी केले आहेत. मागील आठवड्यात या इलेक्ट्रीक काट्यांची खरेदी करण्यात आली आहे. तर सद्य स्थितीत त्यांची असेम्ब्लींग केली जात आहे. हे काम पूर्ण होताच काही दिवसांनी बाजार समितीत शेतकरी विक्रीसाठी आणत असलेल्या धानाची इलेक्ट्रीक काट्यांनी मोजणी केली जाणार आहे. यासाठी बाजार समित्यांत असलेल्या शेड मध्ये हे नवे इलेक्ट्रीक काटे लावले जाणार असून जुणे काटे हटविले जातील. पणन महामंडळाने घेतलेला हा निर्णय तसा महत्वपूर्ण आहे. मात्र इलेक्ट्रीक मशीनही मानवानेच तयार केली असून त्यातही सेटींग केली जाऊ शकते. त्यामुळे महामंडळाचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे बघायचे आहे.
आता इलेक्ट्रीक काट्याने होणार धानाची मोजणी
By admin | Updated: December 29, 2014 01:38 IST