लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गावपातळीवर शासन आणि प्रशासनाचा मध्यम दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलिस पाटलांच्या मानधनात शासनाने एप्रिल २०२४ वाढ केली. यानंतर सप्टेंबर महिन्यापर्यंत नियमित मानधन देण्यात आले. पण ऑक्टोबर २०२४ पासून तीन महिन्यांचे मानधन अद्यापही जिल्ह्यातील पोलिस पाटलांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाही. त्यामुळे खात्यावर मानधन जमा करण्यास अडचण काय असा सवाल जिल्ह्यातील ६५९ पोलिस पाटलांकडून केला जात आहे.
जिल्ह्यात एकूण ९४८ गावे असून सध्या स्थितीत ६५९ पोलिस पाटील कार्यरत आहे. पोलिस पाटील हे गावपातळीवर महसूल विभाग व पोलिस विभागाला सहकार्य करीत असतात. गावातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवणे, गावात घडणाऱ्या घटना घडामोडींची माहिती वेळोवेळी पोलिस विभाग आणि प्रशासनाला देणे, सामाजिक उपक्रम, सण, उत्सव आदी काळात प्रशासनाला मदत करीत असतात. तसेच निवडणूक कार्यातदेखील पोलिस पाटलांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे पोलिस पाटलांना गावपातळीवर शासन आणि प्रशासन यांच्यात दुवा साधणारा म्हटले जाते.
यापूर्वी पोलिस पाटलांना ७५०० रुपये मानधन दिले जात होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी शासनाने पोलिस पाटलांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. तसेच एप्रिल २०२४ पासून पोलिस पाटलांना वाढीव मानधन लागू केले. हे वाढीव मानधन पोलिस पाटलांना सप्टेंबरपर्यंत नियमित मिळाले. पण ऑक्टोबरपासून अद्याप म्हणजे तीन महिन्यांचे मानधन अद्यापही पोलिस पाटलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलिस पाटलांची आर्थिक कोंडी झाली आहे. मानधन केव्हा जमा होणार यासाठी पोलिस पाटील संबंधित विभागाकडे विचारणा करीत आहे. पण त्यांना ठोस उत्तर दिले जात नसल्याचे पोलिस पाटलांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मानधन जमा करण्यासाठी शासनाचे दोन पत्र पोलिस पाटलांचे थकीत असलेले मानधन सीएमपी डीबीटी प्रणालीअंतर्गत त्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत शासनाने ऑक्टोबर व डिसेंबर महिन्यात पत्र दिले आहे. विशेष म्हणजे राज्यातील पोलिस पाटलांच्या थकीत मानधनासाठी ३९ कोटी ६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे पत्र अव्वर सचिव भिकन ठाकूर यांनी ६ जानेवारी रोजी काढले आहे. हे पत्र पोलिस पाटील संघटनेलासुद्धा दिले आहे. पण यानंतरही पोलिस पाटलांच्या खात्यावर मानधनाची रक्कम जमा झाली नाही.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पोलिस पाटलांची संख्यातालुका गोंदिया - ४२ सडक अर्जुनी - ७७ अर्जुनी मोरगाव - ४५ आमगाव - ४२ तिरोडा - ६२ सालेकसा - ७६ देवरी - २७ गोरेगाव - ५२
"पोलिस पाटलांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहे. थकीत मानधनासाठी शासन आणि प्रशासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करण्यात आला. यानंतर अव्वर सचिवांनी मानधनासाठी निधी उपलब्ध असल्याचे पत्र दिले आहे. पण अद्यापही मानधन जमा करण्यात आले नाही. त्यामुळे मानधन जमा करण्यास नेमकी अडचण काय हे कळण्यास मार्ग नाही."- भृंगराज परशुरामकर, राज्य कार्याध्यक्ष पोलिस पाटील संघटना.