बाराभाटी : परिवहन महामंडळाची कोणतीच बस अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा या रस्त्यावरून धावत नाही. यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत. प्रवाशांना प्रवास करतांना बस दिसत नाही. या मार्गावर नवेगावबांध, देवलगाव, कवठा, डोंगरगाव, येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, सुकडी-खैरी या ९ गावातील लोकांनी दोन वर्षापासून बसचा प्रवास केला नाही. सदर मार्गावरून गेल्या २ वर्षापासून परिवहन महामंडळाची बस धावणे बंद झाली आहे. एखाद्या वेळी शालेय विद्यार्थीनीसाठी अहिल्याबाई होळकर योजनेची बस धावते पण तेथे प्रवाशांना बसू दिले जात नाही. हा रस्ता सोडला की तालुक्याच्या क्षेत्रात सर्वत्र बसचा प्रवास होतो. अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा मार्ग बस प्रवासापासून वंचीत आहे. तरी कोणताच लोकप्रतिनिधी ही समस्या सोडवत नाही. या मार्गावर २ वर्षापासून बस बंद आहे. तेव्हा आॅटोवाले चालक मनमर्जीपणा करतात. ६+१ अशा आॅटोचा प्रवास नियमाने आहे. तर या रस्त्यावर १५+१ असे प्रवासी भरून नेतात. भरगच्छ भरलेला आॅटो हा अपघाताला आमंत्रण देत आहे. सदर मार्गावरील प्रवासी बसच्या प्रतिक्षेत आहेत. प्रवासी निवारे प्रवाशांविना दिसतात. बस समस्या कधी सुटणार याकडे लक्ष आहे. या मार्गावर तत्काळ बस सुविधा सुरु करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
नऊ गावांनी दोन वर्षांपासून बस पाहिलीच नाही
By admin | Updated: April 23, 2017 01:51 IST