गोंदिया : आमगाव तालुक्यात बांधकाम विभाग व कंत्राटदार यांच्यातील संगनमतातून तयार झालेल्या निकृष्ट रस्त्याचे पितळ दोन महिन्यातच उघडले पडले आहे. सतत तीन दिवस झालेल्या पावसानंतर या रस्त्यावरील डांबरीकरण उखडून गेले आहे. त्यामुळे रस्त्याची पार वाट लागली असून या कामाचा दर्जा किती सुमार आहे हे उघड झाले आहे.आमगाव तालुक्यात बांधकाम विभाग व कंत्राटदारांनी रस्ते डांबरीकरण करताना आपला ‘हेतू’ साध्य केल्याने हे रस्तेच पावसात वाहून गेले. आमगाव-कामठा या मार्गावर डांबरी रस्त्याचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पावसाळापूर्वी बांधकामाचे नियोजन असूनही वेळेवर बांधकाम सुरू करण्यात आले नाही. कंत्राटदार व बांधकाम विभागाने रस्त्याचे बांधकाम पावसाळा सुरू होताच सुरू केले. त्यामुळे बांधकाम त्वरित आटोपण्यासाठी कंत्राटदाराने धावपळ केली. परंतु बांधकाम योग्य पध्दतीने करण्याकडे विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले. आमगाव-कामठा मार्ग तसेच ग्रामीण रस्ते डांबरीकरण बांधकाम करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. यासाठी नागरिकांनी रस्त्याची वाताहत बंद व्हावी तसेच खड्डेमय रस्ते असल्याने नागरिकांना अपघाताला समोरे जावे लागत असल्याने नागरिकांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. परंतु डांबरीकरण रस्ते बांधकाम करणारा विभाग व कंत्राटदाराने बांधकामे गुणवत्तापूर्ण केली नाही. त्यामुळे रस्ते बांधकाम करूनही त्याचे पुन्हा खड्ड्यात रुपांतर झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा अपघातांना समोरे जावे लागत आहे. नागरिकांनी बांधकाम विभाग व कंत्राटदार यांच्याविरूध्द शासनाने योग्य कारवाई करावी आणि या कामाची गुण नियंत्रण विभागाकडून तपासणी करावी अशी मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
नवीन डांबरी रस्ते गेले दोन महिन्यातच वाहून
By admin | Updated: July 29, 2014 23:53 IST