गोंदिया : गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालय आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे फायर ऑडिट झाले असून इलेक्ट्रिक ऑडिट अद्यापही झालेले नाही. या रुग्णालयातील इलेक्ट्रिक स्वीच बॉक्सची झाकणे गायब झाली आहेत. बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे अद्यापही इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट झाले नसून भगवानभरोसे कामकाज सुरू आहे. या रुग्णालयाच्या इमारतीला ८२ वर्षे झाली असून इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येसुध्दा ही इमारत जीर्ण झाली असून वापरण्यास योग्य नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र यानंतर याच जीर्ण इमारतीतून गर्भवती महिला आणि बालकांवर उपचार केला जात आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याची अद्यापही शासन व प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
......
ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात विदारक स्थिती
जिल्ह्यातील १ उपजिल्हा रुग्णालय, ८ ग्रामीण रुग्णालये, २९८ प्राथमिक आराेग्य केंद्र आणि उपकेंद्र आहेत. त्यांचे अद्यापही फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्यात आलेले नाही. शेवटचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट केव्हा केले याची माहिती आराेग्य यंत्रणेकडे नाही. अनेक रुग्णालयात फायर इस्टिंगविशरचीसुध्दा सोय नाही. तर इमारतींचीसुध्दा बिकट अवस्था आहे. त्यामुळे माेठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.....
चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती जीर्ण
जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अजूनही याच जीर्ण इमारतींतून कारभार सुरू आहे.