गोंदिया : जगात स्पर्धा सुरू आहे. कुठलाही विभागा असो स्पर्धा असते. अशावेळी शहरी भागातील मुलांना विविध संधी उपलब्ध होतात. परंतु ग्रामीण भागात हव्या तशा सोयी-सुविधा उपलब्ध नसतात. अशावेळी बारटीमार्फत बँकिंग, रेल्वे, एलआयसी आदी क्षेत्रात लिपीकवर्गीय पदांसाठी प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेने खूप मोठी संधी गोंदिया जिल्ह्यात उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा ध्येय प्राप्तीसाठी ग्रामीण भागातील युवा वर्गाने स्पर्धेमध्ये टिकून राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आ. राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालय सिव्हील लाईन गोंदिया येथे प्रबुद्ध कोचिंग सेंटरमध्ये बँकिंग, रेल्वे, एलआयसी आदी लिपीकवर्गीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले. सदर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेचे संस्थाध्यक्ष शुद्धोदन शहारे होते. अतिथी म्हणून प्रा. सतीश बन्सोड उपस्थित होते.आ. राजकुमार बडोले पुढे म्हणाले की, स्पर्धेच्या युगात स्पर्धा असतेच. त्यासाठी प्रशिक्षण असले तरच स्पर्धेत उतरणे यशस्वी ठरते. शासनाने आता स्कील डेव्हलपमेंटकडे अधिक लक्ष देणे सुरू केले आहे. तेव्हा समाज व देशाचा विकास निश्चित होईल. आपला देश तरूणांचा देश आहे. तेव्हा तरूण हे बेरोजगार दिसता कामा नये. त्यामुळे संधीचे सोने करणे शिकले पाहिजे, असे ते म्हणाले.यानंतर प्रा. सतीश बन्सोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीवर प्रकाश टाकला. सामाजिक भान ठेवून चळवळ जिवंत ठेवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. केवळ शिक्षण घेणे हे आमचे काम नाही. तर शिक्षण, नोकरी यासह समाज प्रगती पथावर जाण्यासाठी प्रत्येकाने मोलाचा वाटा उचलावा, असे त्यांनी सांगितले. शुद्धोदन शहारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेद्वारे सुरू असलेल्या योजनांचा आढावा ठेवला. त्या योजनांकडे आ. बडोले विशेष लक्ष घालतील व ग्रामीण भागातील मुलांसाठी अजून पुन्हा वाढीव बॅच देण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असे म्हणाले. आ. राजकुमार बडोले हे निवडून आल्यानंतर प्रथमच प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेद्वारे सुरू असलेल्या प्रबुद्ध कोचिंग सेंटरला भेट देवून मार्गदर्शन केले. त्यांचे स्वागत संस्थाप्रमुख शुद्धोदन शहारे व प्रबुद्ध कोचिंग सेंटरच्या सर्व कर्मचारी वृदांनी केले. यावेळी बडोले यांनीही त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूपेश शहारे, संचालन हिरचंद रोडगे व आभार सुप्रिया राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी कोचिंग सेंटरचे व्यवस्थापक प्रदीप राहुलकर, सहायक ग्रंथपाल निधी शहारे, विजय कोल्हे, भूपेश शहारे, ज्ञानदीप हांडेकर, विनय वाघमारे व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील युवा वर्गास स्पर्धेत टिकून राहण्याची गरज
By admin | Updated: October 29, 2014 22:52 IST