‘आरजे’ अमीत यांचे प्रतिपादन : रेडिओ जॉकीमध्ये करियर करण्यासाठी दिला कानमंत्र गोंदिया : जेव्हा आपण श्रोत्यांच्या स्वरूपात उत्तम वक्त्यांचे विचार ऐकतो, तेव्हा आपल्याला वाटते की आपण कधी त्यांची जागा घेऊ शकणार नाही. याचे कारण म्हणजे आपल्यात त्यांच्यासारखे वाक्चातुर्य नाही, आपण प्रतिभावान आणि बुध्दीमान नाही, असे आपल्याला वाटते. पण हे शक्य आहे. जर तुम्ही सामान्य बुध्दीचे असाल, तुम्हाला वेळेवर योग्य शब्द आठवत नसतील किंवा तुम्ही बोलताना चुका करीत असाल तरीही तुम्ही श्रोत्यांची मने जिंकू शकता व यशस्वी वक्ता बनू शकता. आणि चांगला वक्ता यशस्वी व्यक्ती बनू शकतो, असे प्रतिपादन आर.जे. (रेडिओ जॉकी) अमीत अग्रवाल यांनी केले. लोकमत युवा नेक्स्ट व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक मनोहरभाई पटेल बी.फार्म. महाविद्यालयात आयोजित आर.जे. सेमीनार व युवा नेत्वृत्व सामुदायिक कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, हे सगळे तुमच्या यशाकडे बघण्याच्या दृष्टीकोनावर आणि तुम्ही यश मिळविण्यासाठी कशी योजना तयार करता यावर अवलंबून आहे. कार्यक्रमाची सुरूवात लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोहरभाई पटेल बी.फॉर्म. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.भोंगाडे, मनोहरभाई पटेल डी.फॉर्म. कॉलेजचे प्राचार्य डॉ. टी.जी. अग्रवाल, युवा नेहरु केंद्राचे संयोजक अखिलेश मिश्रा, डॉ. प्रा. पी.पी. काटोलकर, फॅमीना फॅशन डिजायनिंग महाविद्यालयाच्या संचालिका अफरीन शेख, सॅम्स क्रियेशनचे संचालक हमीद अंसारी, एच.आर. बोपचे, नागपूर लोकमत इव्हेंट्सचे अश्विन पतरंगे, प्रा.पूनम भांगे, लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत, बालविकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार उपस्थित होते.यावेळी प्राचार्य डॉ. टी.जी. अग्रवाल यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, लोकमत वृत्तपत्र हा एकमेव असा समूह आहे की, ज्यांनी नेहमीच सामाजिक बांधीलकी जपली आहे. लोकमत युवा नेक्स्ट युवकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असून युवकांतील सुप्त गुण बाहेर आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. या व्यासपीठाचा जास्तीत जास्त युवकांनी फायदा घ्यावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित इतर मान्यवरांनीसुध्दा मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित एक दिवसीय आर.जे. कार्यशाळेत नागपूरवरून आलेल्या रेडीयो मिर्चीचे आर.जे. अंकीत अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना आर.जे.मध्ये कॅरीअर करण्यासाठी विविध टिप्स दिल्या. यात उत्तम संचालन कसे करावे, जाहिरात कशी करावी, शब्दांची मांडणी, आवाजात चढ-उतार, आपल्या आवाजावर मेहनत, घश्याची काळजी, थोडक्यात आणि स्पष्ट कसे बोलावे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी गीत गायन, नृत्य व उत्तम सूत्र संचालन आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मेहता पटेल, स्विटी उके, संदीप वाढई व इतर विद्यार्थ्यांनी बक्षिसे जिंकली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्राचे संचालन मनोहरभाई पटेल बी.फॉर्म.च्या विद्यार्थिनी मेघना पटेल व स्विटी उके यांनी केले. सुरूवातीला दिव्या भगत यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. तसेच आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी दर्पण वानखेडे, प्रमोद गुडधे, लक्की भोयर, रतन मेश्राम यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी उत्तम वक्ता बनण्याची गरज
By admin | Updated: August 12, 2014 23:49 IST