गोरेगाव : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी व नागरिकांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी गोरेगाव येथे मोर्चा काढून तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. माजी आ.दिलीप बन्सोड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रीकापुरे, तालुकाध्यक्ष केवल बघेले आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.यावेळी प्रामुख्याने केलेल्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, शासनाच्या विविध योजनांमधून रखडलेले घरकूल मंजूर करावेत, इंदिरा आवास योजनेची रक्कम त्वरित द्यावी, एपीएल कार्डवर पूर्वी मिळणारे धान्य पुन्हा मिळावे, तालुक्यातील अनेक गावातील पााणी टंचाई दूर करावी, धानाला ३००० रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांची वीज बिल माफ करावे, विविध योजनांमधून मिळणारे मासिक अर्थसहाय्य वेळेवर मिळावे अशा २७ मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या.यावेळी माजी आ.बन्सोड, जिल्हाध्यक्ष हरिणखेडे, परशुरामकर, चंद्रीकापुरे, बघले आदी नेत्यांनी मार्गदर्शन करताना केंद्र राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टिका केली. या शासनाला शेतकऱ्यांबद्दल आस्था नसून सर्वसामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, ललिता चौरागडे, डुमेश्वर चौरागडे, रजनी बिसेन, अनिता तुरकर, बाबा बोपचे आदी अनेक जण उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर गोरेगावात राष्ट्रवादीचा मोर्चा
By admin | Updated: April 30, 2016 01:41 IST