गोंदिया : केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भरनोली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली विस्फोटके गोंदिया पोलिसांनी १० जानेवारीला जप्त केले. नक्षलवाद्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्यासाठी जमिनीत स्फोटके पेरून ठेवल्याचे बोलले जाते.
आगामी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदचे निवडणुकीमध्ये घातपात घडवून आणून पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी स्फोटक पेरून ठेवल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया पोलिसांनी १० जानेवारीला अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या नेतृत्वात सी-६० नवेगावबांध येथील कमांडो पथक, सशस्त्र दूरक्षेत्र भरनोली येथील अधिकारी व अंमलदार, बी.डी.डी.एस.पथक,यांनी भरनोली जंगल परिसरात ‘सर्च ऑपरेशन’ राबवून बोरटोला ते धानोरी पहाडी उतार भागात दगडाच्या बाजूला काही संशयास्पद वस्तू आढळल्याने श्वानपथक व बी.डी.डी.एस. पथकाचे साहाय्याने लपवून ठेवलेले स्फोटके बाहेर काढले. जर्मन डब्बा १० कि.ग्रॅम क्षमतेचा, लोखंडी खिळ, काच,वायर, काळी स्फोटक पावडर असे स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी केशोरी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७, सहकलम १८,२०,२३ यु.ए.पी.ए. सहकलम ४,५ भारतीय स्फोटक पदार्थ कायदा अन्वये अज्ञात नक्षलवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधीकारी जालिंदर नालकुल करत आहेत.