अर्जुनी/मोरगाव : नवनिर्वाचित खासदार नाना पटोले यांची शनिवारी को-आॅपरेटिव्ह बँकेसमोर लाडूतुला करण्यात आली. येथून अर्बन बँक चौकापर्यंत गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक (रॅली) काढण्यात आली. त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी उभ्या असलेल्या मतदारांचे हात जोडून आभार मानले. शनिवारला दुपारी २ वाजता नाना पटोले यांच्या लाडूतुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दूपारपासूनच कार्यकर्त्यांनी उन्हाचे चटके सहन करीत प्रतिक्षा केली. पटोले हे तब्बल तीन तास उशीरा पोहोचले. त्यांचे येथे आगमन होताच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. लाडूतुला होताच एका उघड्या वाहनातून रॅली काढण्यात आली. यावेळी पटोले यांच्यासोबत आ. राजकुमार बडोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आशिष वांदिले, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शैलेष जायस्वाल, नामदेव कापगते, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रकाश गहाणे, किरण कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार, महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या रचना गहाणे, दुर्योधन मंैद, सरपंच किरण खोब्रागडे, विजयसिंह राठोड, वर्षा घोरमोडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी नाना पटोले यांनी चारभट्टी येथे जावून हनुमान मंदिरात दर्शन घेतले. त्यांचे वाहन धाबेटेकडी/आदर्श, झरपडा, ताडगाव, बाराभाटी व नवेगावबांध येथे थांबवून कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. (तालुका प्रतिनिधी)
नाना पटोले यांची लाडूतुला व मिरवणूक
By admin | Updated: May 17, 2014 23:44 IST