गोंदिया : शहरासाठी मंजूर असलेली भुयारी गटार योजना कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला देण्यात आली होती. मात्र ती योजना आता नगर पालिकेमार्फतच कार्यान्वित करण्याचा निर्णय पालिकेच्या आमसभेत घेण्यात आला. सात महिन्यानंतर पालिकेच्या सभागृहात झालेली आमसभा मंगळवार व बुधवारी दिवसभर चालली. या आमसभेत ५३ विषयांना मंजूरी देण्यात आली. विशेष म्हणजे या आमसभेत विरोधी पक्षासह खुद्द सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीच अध्यक्षांच्या विषयांना विरोध दर्शविला. यातून पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. मागील सात महिन्यांपासून पालिकेची आमसभा अध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी बोलाविली नव्हती. या विषयावरील लोकमतच्या बातमीची दखल घेत अखेर मंगळवारी (दि.११) पालिकेची या वर्षातील पहिली आमसभा घेण्यात आली. ५३ विषय मांडण्यात आलेल्या या आमसभेत सर्व विषयांना या आमसभेत मंजूहरी देण्यात आली असली तरिही काही विषय मात्र चांगलेच गाजले. यात होर्डींग्स, बॅनर व पोस्टर नगर परिषद क्षेत्रात लावण्याचे काम कंत्राटी पद्धतीवर देण्याचा विषय मांडण्यात आला. या विषयाला आमसभेत मंजूरी देण्यात आली असली तरिही त्याला कॉंग्रेसच्या सदस्यांनी विरोध दर्शविला होता. त्याचप्रकारे बैठकी बाजार वसुली ठेका पद्धतीने देण्याचा विषय मांडला असता त्यालाही कॉंग्रेसच्या सदस्यांनी विरोध दर्शविला. मात्र या विषयालाही अखेर मंजूरी मिळाली. याशिवाय भूयारी गटार योजना पालिकेच्या माध्यमातून कार्यान्वीत करण्याचा विषय मांडण्यात आला. १२५ कोटींची ही योजना असून यात १० टक्के रक्कम पालिकेला भरावयाची आहे. मात्र पालिका आर्थिक व तांत्रीक दृष्टया सक्षम नसल्याचे सांगत राकेश ठाकूर यांनी योजना पालिकेच्या माध्यमातून राबविण्याबाबत विरोध दर्शविला. मात्र बहुमताने या प्रस्तावाला मंजूरी प्रदान करण्यात आली. त्याचप्रकारे सुमारे १५ कोटींच्या नाट्यगृहाच्या कामात ४२ लाख रूपयांची वाढ होत असल्याने त्याबाबत विषय मांडण्यात आला. यावर उपस्थितांनी शासनाकडून यासाठी मागणी करण्याचे सुचविण्यात आले व प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. तसेच शहरातील गांधी प्रतिमा परिसरातील नझूलची जागा सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीला देण्यास मंजूरी प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे पालिकेत १० लेबर सोसायटींची नोंदणी करण्याचा प्रस्ताव मांडला असता याला कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांसह सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीही विरोध दर्शविला. मात्र बहुमताने या प्रस्तावालाही मंजूरी प्रदान करण्यात आली. अशाप्रकारे ५३ विषयांवर आमसभा गाजली व त्यांना मंजूरी प्रदान करण्यात आली. नगराध्यक्ष कशिश जायस्वाल व मुख्याधिकारी जी.एन.वाहूरवाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. (शहर प्रतिनिधी)सत्ताधारी सदस्यांनीच दर्शविला विरोध पालिकेच्या या आमसभेत विरोधी पक्षातील सदस्यांचा कमी तर सत्ताधारी पक्षातील एका गटाचा बहुतांश विषयांना विरोध दिसून आला. यातून भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. अध्यक्षांच्या प्रत्येकच विषयाला या गटाने विरोध केला. यावेळी गटातील सदस्य चांगलेच आक्रमक असल्याचीही माहिती आहे. विरोध करणाऱ्या गटात पुरूषांसह महिला सदस्यांचाही समावेश आहे. यातून पालिकेतील या गटाला विद्यमान अध्यक्षच नको असल्याचेही बोलले जात आहे. दीर्घ काळ चाललेली पालिकेतील पहिलीच आमसभा मंगळवारी (दि.११) आयोजित या आमसभेसाठी ५३ विषयांची सूची तयार करण्यात आली होती. त्यामुळे रात्री ८.३० वाजता पर्यंतसभा चालली. तहीही फक्त २५ विषयांवरच चर्चा झाल्याने सभा दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.१२) घेण्यात आली. यात उर्वरीत २८ विषयांवर चर्चा झाली व सायंकाळी ६ वाजता सभा संपली. विशेष म्हणजे गोंदिया नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दिवस आमसभा घेण्यात आल्याचे कळले. अध्यक्षांनी पद सोडण्याची मागणी पालिकेची आमसभा विरोधी पक्षातील सदस्यांनी कमी तर सत्ताधारी पक्षातीलच सदस्यांनी जास्त गाजविल्याचे माहिती होत आहे. अशातच सत्तेत राहून विरोध दर्शविणाऱ्या या गटातील एका सदस्याने चक्क अध्यक्षांवरच आगपाखड केल्याचीही माहिती मिळाली. त्या सदस्याने अध्यक्षांना पालिकेतील कारभाराबाबत काहीच माहिती नसल्याचा टोला लगावत अध्यक्षांनी पद सोडून देण्याची मागणीही केल्याची माहिती आहे.
‘भुयारी गटार’चे कार्यान्वयन पालिकेकडेच
By admin | Updated: August 14, 2015 01:56 IST