वियय मानकर
सालेकसा : भंडारा येथील घटनेनंतर आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. आरोग्य विभागाचा गलथान कारभार दररोज पुढे येत आहे. आदिवासीबहुुल व दुर्गम तालुक्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. रुग्णांच्या सोयीसाठी येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात आले असले तरी, त्या ठिकाणी दाखल केेल्या जाणाऱ्या गर्भवती महिला व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना चक्क बाळासह चक्क जमिनीवर झोपून रात्र काढावी लागत आहे.
सालेकसा तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून, सध्या एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होत नाही. केवळ ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथेच शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी दर आठवड्याला एकच गर्दी असते. कावराबांध आणि सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढे शस्त्रक्रिया सुरू केल्या जाईल, असे सांगितले जात आहे. कोरोनामुळे मागील आठ-नऊ महिन्यापासून सर्वच ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद होत्या. बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने तिथे शस्त्रक्रिया बंद आहेत. दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्यापही शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या नाही. केवळ ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया होत आहेत. येथे दररोज ५० ते ६० शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मंगळवारी (दि.१२) लोकमत प्रतिनिधीने ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता शस्त्रक्रियेसाठी आलेल्या अनेक महिला प्रतीक्षा करीत होत्या. बाहेरून येणाऱ्या लोकांना पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. तर शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिला खाली टाकलेल्या गाद्यांवर झोपल्या होत्या, एवढी विदारक स्थिती या रुग्णालयाची आहे.
.....
केवळ ३० बेडची व्यवस्था
येथील ग्रामीण रुग्णालयात एकूण तीन वाॅर्ड आहेत. प्रत्येक वाॅर्डात १० प्रमाणे एकूण ३० बेडची व्यवस्था आहे. यातील दोन वाॅर्ड महिला आणि पुरुष सामान्य रुग्णांसाठी असून, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांसाठी एका वॉर्डात व्यवस्था केली जाते. अशात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यापूर्वी किंवा शस्त्रक्रिया केल्यानंतर आई आणि बाळाला जमिनीवरच झोपावे लागते. कधी जागा अपुरी पडल्यास व्हरांड्यातसुद्धा झोपावे लागत असल्याची माहिती आहे.
......
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव
या ग्रामीण रुग्णालयात दर सोमवारी आणि मंगळवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे दोन दिवस या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पूर्णपणे अभाव दिसून आला.
....
एकाच दिवशी ६९ शस्त्रक्रिया
रुग्णांची वाढती संख्या पाहून आता आठवड्यातून दोन दिवस कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली जात आहे. मंगळवारी एकच दिवशी ६९ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर पाच ते सात दिवस भरती इत्यादीमुळे ग्रामीण रुग्णालय नेहमी गजबजले असते. मात्र याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
बॉक्स
एकाच डॉक्टरच्या भरवशावर शस्त्रक्रियेची जवाबदारी
ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथील वैद्यकीय अधीक्षक अधिकारी डॉ. एस. आर. रामटेके यांच्या खांद्यावर संपूर्ण रुग्णालयाची जवाबदारी आहे. त्यांना एकट्याला सर्व शस्त्रक्रिया कराव्या लागतात.