प्रस्ताव मंजूर : ९२.८४ लाखांचे कर्ज केले माफ गोंदिया : जिल्ह्यातील आणखी ७८४ शेतकऱ्यांची सावकारांच्या पाशातून मुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीच्या शुक्रवारी (दि.४) पार पडलेल्या बैठकीत ७८४ शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यातून या शेतकऱ्यांचे ९२ लाख ८४ हजार ३१० रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. कर्जबाजारीपणामुळे त्रस्त होऊन आत्महत्येच्या दारी पोहोचणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विदर्भ व मराठवाड्यात वाढतच आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देत शासनाने परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी योजनाच हाती घेतली होती. यावर सहकार विभागाच्या शासन निर्णयानुसार कर्जमाफीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे असे हजारो प्रस्ताव आले होते व आलेल्या प्रस्तावांवर टप्याटप्याने निर्णय घेण्याचे काम जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून सुरू आहे. शुक्रवारी (दि.४) जिल्हास्तरीय समितीची तिसरी बैठक जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी प्रवीण नावडकर, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर, जिल्हा विशेष लेखापरिक्षक सुपे व सहायक निबंधक ए.बी.गोस्वामी उपस्थित होते. या बैठकीत समितीने ७८४ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर केले. या प्रस्तावांतील शेतकऱ्यांचे अशाप्रकारे ९२ लाख ८४ हजार ३१० रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समितीची ही तिसरी बैठक होती. यापूर्वी झालेल्या दोन बैठकीतील प्रस्ताव मिळून आता जिल्ह्यातील १४६६ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे या शेतकऱ्यांचे एक कोटी ६० लाख ४७ हजार ९२४ रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सर्वाधिक ५९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर सर्वात कमी गोरेगाव तालुक्यातील ७७ शेतकरी आहेत. (शहर प्रतिनिधी)
आणखी ७८४ शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्ती
By admin | Updated: December 9, 2015 02:07 IST