मुंडीकोटा : घोगरा ते मुंडीकोटा रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. मुंडीकोटा हे गाव केंद्राचे ठिकाण असून येथे आठवडी बाजार भरतो. येथे छोटीशी व्यापारपेठ आहे. तसेच बँक, आरोग्य केंद्र रेल्वे स्टेशन येथे अनेक कामासाठी मुंडीकोटा गावी घोगरा, पाटीलटोला, घाटकुरोडा, चांदोरी, बिरोली येथील अनेक नागरिक व शाळकरी मुले याच रस्त्यांनी ये-जा करतात. त्यामुळे त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. मुंडीकोटा ते घोगरा रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झालेले होते. त्यामुळे रस्ता दुरूस्त झालेला होता. पण या वेळी हा रस्ता सर्वत्र फुटून जीर्ण झाला आहे. ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. खड्ड्यांतील पाणी वाहन जात असताना येणाऱ्या व जाणाऱ्यांचा कपड्यांवर उडून कपडे खराब होतात. शिवाय खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. मुंडीकोटा ते घोगरा या रस्त्याने नवीनच बस सेवा सुरू झाली आहे. पण ती बससेवा रस्त्याअभावी बंद होणाऱ्या मार्गावर दिसत आहे. या रस्त्याने मोटार सायकल चालवणे कठीण झाले आहे. पावसात हलके वाहन चालविताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरील गिट्टी व डांबर कुठे गेला, याचा पत्ताच नाही. रस्त्यावर मोटार-सायकल चालविणारे अनेक व्यक्ती जखमी झालेले आहेत. सदर रस्त्याकडे जि.प. सदस्य तसेच इतर लोकप्रतिनिधी व संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. सदर रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
घोगरा ते मुंडीकोटा रस्त्यांची दैनावस्था
By admin | Updated: September 10, 2015 02:16 IST