गोंदिया : कोरोनाबाधितांच्या उपचारात वापरलेले साहित्य सेल्सटॅक्स कॉलनीतील खुल्या जागेत टाकले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, हा प्रकार थांबवावा, अशी मागणी जिल्हा भाजप विद्यार्थी मोर्चाने केली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना दिले आहे.
सध्या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जग हादरले आहे. अनेक जण नको त्या समस्यांना तोंड देत आहेत. गोंदिया शहरातसुद्धा शासकीय आणि खासगी रुग्णालयांत अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना संबंधित डॉक्टर, नर्स आणि इतरांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून पीपीई किट व इतर साहित्याचा उपयोग केला जात आहे. मात्र उपचार झाल्यानंतर दुसऱ्यांदा दुसऱ्या रुग्णांवर त्या साहित्याचा उपयोग करता येत नाही. त्यामुळे अशा वापरलेल्या खराब साहित्यापासून दुसऱ्यांना लागण होऊ नये म्हणून ते जाळणे किंवा मातीत पुरणे अतिआवश्यक आहे. परंतु तसे न करता हे सर्व साहित्य मोक्षधाम तसेच सेल्सटॅक्स कॉलनीच्या मागील मोकळ्या जागेत दररोज फेकले जात आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवावा, अशी मागणी जिल्हा भाजप विद्यार्थी मोर्चाने केली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना दिले आहे. जिल्हाध्यक्ष पारस पुरोहित, कुणाल वाधवानी, शुभम शर्मा, भरत श्रीवास, भावेश चौरसिया, अनुल लांजेवार आदी या वेळी उपस्थित होते.