हुंडाबळी : पती, सासू, सासरा व नणद यांना अटकबोंडगावदेवी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील येरंडी/देवलगाव येथील विवाहित महिला मनिषा अरविंद गेडाम (२५) हिला माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळीकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. या कटकटीला कंटाळून तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. अखेर नवेगावबांध पोलिसांनी २५ आॅगस्ट रोजी मनिषाचा पती, सासू, सासरा व नणद यांना अटक केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोंडगावदेवी येथील खुशाल ठवरे यांची मुलगी मनिषा हिचे लग्न येरंडी/देवलगाव येथील अरविंद सदाराम गेडाम (३५) याच्यासोबत जानेवारी २०१० मध्ये जातीरिवाजानुसार झाले होते. लग्न झाल्यापासून एक वर्षापर्यंत सासरच्या मंडळीकडून तिला चांगली वागणूक मिळाली होती. मात्र केवळ बारा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर मनिषाचा पती अरविंद, सासरा सदाराम, सासू पंचशीला तसेच खांबी येथे राहणारी नणद ही येरंडीला वारंवार येत होती. त्या सर्वांनी संगनमत करून मनिषाला माहेरून ३० हजार रूपये आण, असे बोलून मानसिक व शारीरिक त्रास सुरू केला होता. वारंवार मारहाण करून तिला जेवणसुद्धा करू देत नसत. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या या त्रासाची तसेच हुंड्यासाठी करण्यात येणाऱ्या छळाची माहिती मनिषाने आपले आई-वडील व भावाला दिली होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने सासरकडील मागणी तिचे आई-वडील पूर्ण करू शकत नव्हते. मुलीच्या घरच्या लोकांच्या वागण्यात सुधारणा होवून मनिषाला ते चांगली वागणूक देतील, अशी समजूत घालून मुलीला सासरी पाठवित होते. काही दिवस लोटल्यानंतर घटनेच्या दोन वर्षांपूर्वी माहेरून ३० हजार रूपये आण, अशी दमदाटी ्रकरून त्यांना मनिषाला तिच्या माहेरी बोंडगावदेवी येथे पाठविले होते. तेव्हापासून ती आपल्या मुलासोबत येथे होती. त्यावेळीसुद्धा मनिषाने आपल्या आई-वडील व भावाजवळ हुंड्यासाठी नेहमी मारझोड करून सासरचे लोक छळ करीत असल्याचे तिने सांगितले होते. दोन दिवसांनी मनिषाचा पती अरविंद हा बोंडगावदेवी येथे येवून जोरजबरदस्तीने मुलाला घेवून गेला. नंतर मनिषाचा सासरा सदराम आला व त्याने मुलगा तुझ्याशिवाय राहूच शकत नाही, असे सांगून तिला घेवून गेला. गावाजवळच राहत असलेली नणद रंजना रामटेके ही वारंवार येरंडी येथे येवून आपल्या आई-वडील, भाऊ व मनिषासोबत वारंवार भांडायची. १२ आॅगस्ट २०१४ रोजी मनिषा राखी बांधण्यासाठी माहेरी आली. त्यावेळीसुद्धा तिने हुंड्यासाठी पती, सासू व सासरा मारझोड करीत असल्याचे आई-वडील व भावाला सांगितले होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने पैसे देवू शकत नाही, असे मनिषाला तिच्या आई-वडिलांनी समजावून सांगितले. त्यामुळे १४ आॅगस्ट रोजी सासरी जाताना ‘ही शेवटची भेट आहे, यापुढे मी तुमच्या डोळ्याने दिसणार नाही,’ अशी मनिषा बोलली होती. १७ आॅगस्ट रोजी मनिषाने उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती असलेल्या मनिषाला तिच्या आई-वडिलांनी विचारले असता तिने तिचा पती अरविंद, सासरा सदाराम, सासू पंचशीला व ननद रंजना रामटेके यांच्याकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळ व माराला त्रासून उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले. अखेर मनिषाने १९ आॅगस्टच्या रात्री ८.४५ वाजता जीव सोडून आपली इहलोकीची यात्रा संपविली. नवेगावबांध पोलिसांनी पती अरविंद, सासरा सदाराम, सासू पंचशीला, ननद रंजना रामटेके यांना अटक केली. तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)
ही शेवटची भेट असल्याचे सांगत मनिषाने केले मृत्यूला जवळ
By admin | Updated: August 28, 2014 23:54 IST