गोंदिया : जिल्हास्तरीय मानव विकास समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेत पार पडली. सभेला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, जिल्हास्तरीय मानव विकास समितीचे सदस्य मदन पटले उपस्थित होते. या सभेत सन २०१४-१५ च्या कामांचे नियोजन करून विविध विकासात्मक प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. गर्भवती महिलांची व बालकांची आरोग्य तपासणी करणे या योजनेकरिता आरोग्य विभागाकडून आयोजित होणाऱ्या ५६९ आरोग्य शिबिराकरिता १ कोटी ४२ लाखांच्या निधीच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये समस्या व तक्रारी उध्दभवत असल्यामुळे आयोजित होणाऱ्या सर्व शिबिरांचे व्हिडीओ रेकॉर्डीग करण्यात यावे, असे समितीने ठरविले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरी देणे या योजनेकरिता आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील १० हजार ९५२ बाळंत महिलांकरिता प्रति महिला चार हजार रुपयेप्रमाणे ४ कोटी ३८ लाख ८ हजारांच्या निधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करणे या योजनेकरिता संपूर्ण जिल्ह्यात प्रति तालुका ३० लाख रुपये याप्रमाणे एकूण २४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. या योजनेंतर्गत इयत्ता आठवी, नववी व अकरावीमधील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे ठरले. वर्ष २०१३-१४ मध्ये एकूण ५ हजार ३२८ सायकलींचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी १० टक्के सायकलींची तपासणी करुन योग्यप्रकारे वापर होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात यावी, असा निर्णय समितीमध्ये घेण्यात आला. याशिवाय अन्य कामांचे नियोजन करून विविध विकासात्मक प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली.
मानव विकास कार्यक्रम समितीची विकासकामांना मंजुरी
By admin | Updated: December 29, 2014 01:41 IST