गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदार संघावर वर्चस्व असले तरी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांंचे नेटवर्क टिकवून ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे यश आले नसल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीतील प्रफुल्ल पटेल यांच्या पराभवासाठी कार्यकर्त्यांंची ही उदासीनता बर्याच अंशी कारणीभूत ठरली आहे. दोन्ही जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर भाजपाचे वर्चस्व आहे. सहापैकी चार आमदार भाजप-सेनेचे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागावर भाजपाची पकड असली तरी प्रफुल्ल पटेलांसारख्या हेवीवेट व्यक्तिमत्वामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव नेहमीच दिसून आला आहे. तरीही कार्यकर्त्यांंवर पकड ठेवण्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते कुठेतरी कमी पडल्याचे दिसून आले. भंडार्यात राष्ट्रवादीचे अनेक नेते आपापल्या भागात वर्चस्व ठेवून आहेत. परंतू गोंदिया जिल्ह्यात तिरोडा वगळता कुठेही राष्ट्रवादीची पकड दिसून आली नाही. तिरोड्यात माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी घेतलेली मेहनत आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाची केलेली बांधणी यावेळी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. त्यामुळेच या मतदार संघात राष्ट्रवादीला चांगली मते मिळाली. मात्र इतर तालुक्यांमध्ये बन्सोड यांच्यासारख्या लोकनेत्याचा अभाव प्रकर्षाने जाणवला. अर्थात तिरोड्यातील प्रफुल्ल पटेलांना आघाडी मिळण्यात इतरही अनेक घटक कारणीभूत ठरले असले तरी बन्सोड यांची तालुक्यावर पकड असल्याचे यातून स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे पुढील विधानसभेकरिता त्यांनी आपली दावेदारी यातून पक्की केल्याचे दिसून आले. अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी हा भाजपचा गड असला तरी गोंदियात मात्र सध्याच्या घडीला काँग्रेसचे आमदार आहे. पण इथेही राष्ट्रवादीची पकड ढिली झाली असे म्हणण्यास वाव निर्माण झाला आहे.
निष्ठावान कार्यकर्त्यांंची राष्ट्रवादीकडे वाणवा
By admin | Updated: May 17, 2014 00:19 IST