नवेगावबांध : नवेगावबांधसह संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पशुधन वाऱ्यावर असल्याचे बिकट चित्र आहे. जनावरांवर उपचार करण्यासाठी पशू वैद्यकीय अधिकारी नसल्याने वेळीच उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुपालक संकटात असल्याचे चित्र आहे.
नवेगावबांध परिसरातील बहुसंख्य शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. या पशुपालनातून दुग्ध व्यवसायाद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व आर्थिक जुळवाजुळव करतात. शेतकऱ्यांसह शेतमजूर मजूर व भूमिहीन शेतकरी या व्यवसायाला महत्त्व देतात. जवळपास घरोघरी पशुधनाची जोपासना केली जाते, परंतु पशुपालनासाठी संपूर्ण तालुक्यात एकही पशू वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने पशुधनाची हानी होत आहे. डॉक्टरांच्या अभावामुळे येतील पशुपालन धोक्यात आलेले आहे. वेळेवर योग्य उपचार न झाल्याने पशुपालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची भरती यामध्ये केली नसल्याने एका कंपाउंडच्या भरोशावर चार-पाच दवाखान्याचा कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. पंचवीस-तीस गावांचा कारभार एका कंपाउंडरच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन लवकरात लवकर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी नवेगावबांध परिसरातील दूध उत्पादक शेतकरी व पशुपालन बकरी पालन शेतकरी शेतमजूर यांनी केली आहे.