आमगाव : गोंदिया जिल्ह्यात वाढत्या दारू व्यावसायामुळे व्यसनाधिशांची गर्दी वाढत असल्याने या व्यवसायामुळे कायदा, सुव्यवस्था व शांतता भंग होत असून व्यसनांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे ग्रामसभेच्या अधिकारांवर अतिक्रमण करीत मंत्रालयाने दारू परवान्याला मंज़ुरी दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पुढे येत आहे.आमगाव तालुक्यात वाढत्या दारू व्यवसायामुळे अनेक गुन्हेगारी प्रकरणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांनी दारू व्यवसायाला पायबंद करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामसभेतून दारु दुकानांना परवानगी नाकारली आहे. परंतु काही पुढारी पैशाच्या लालसेपुढे बळी पडून दारू दुकानांना परवानगी देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे दारू व्यवसामुळे वाढत्या गुन्हेगारीची दखल घेत नागारिकांनी महिलांच्या पुढाकाराने एल्गार पुकारुन ग्रामसभेच्या माध्यमाने दारु दुकान बंद करण्याचा ठराव पारीत केला. यावेळी, जिल्हाधिकारी विभागाचे अधीक्षक, शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते. वाढत्या नागरिकांच्या उठावापुढे प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला. परंतु रिसामा येथील बियरबारची परवानगी देताना नियमांना डावलून आबकारी विभागाने मंत्रालयातून परवाना मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावल्याची माहिती पुढे येत आहे. रिसामा येथील रहिवासी निकेश मिश्रा यांनी गायत्रीमंदिर परिसरात बिअरबार करिता मागील तीन वर्षापासून ग्रामपंचायतकडे नाहरकरत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली होती. स्वत: ग्रामपंचायत सदस्य असून त्यांना नागरिकांनी बिअरबार करिता नाहरकरत प्रमाणपत्र नाकारले होते.परंतु व्यवसाय सुरू करावा या हेतूने त्यांनी नागरिकांच्या मताविरुद्ध प्रयत्न सुरू ठेवले होते. दुसरीकडे नागरिकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमाने ग्रामसभेतून २०१२ ला बिअरबारचा परवाना विषयी नाहरकत प्रमाणपत्र झुगारुन लावले. सलग दोन वर्षे हा विषय संपुष्टात असल्याचे भासवण्यात आले. मात्र बिअरबारच्या परवानगीसाठी जिल्हा अधिकारी अधीक्षक यांच्या मदतीने ग्रामसभेचे ठराव झुगारुन मंत्रालयातून बिअरबारकरिता परवाना मंजुर करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तर नागरिकांनी या बिअरबार विरुद्ध उठाव करण्यासाठी प्रशासनाला सचेत केले आहे. (शहर प्रतिनिधी)
ठरावाला झुगारुन दिला दारू दुकानाचा परवाना
By admin | Updated: November 2, 2014 22:37 IST