गोंदिया : आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील संरक्षित वन कम्पार्टमेंट ४८९ मध्ये २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान एका नर जातीचा बिबट मृतावस्थेत आढळला. त्या बिबट्याचा भुकेने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात बिबट आणि वाघांची करंट लावून शिकार होण्याचे दोन मोठे प्रकरण समोर आले असताना २ फेब्रुवारी रोजी आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील वाघनदीच्या परिसरात असलेल्या संरक्षित वनात एक बिबट मृतावस्थेत आढळल्याने वनविभाग खडबडून जागा झाला. या बिबटाची करंट लावून शिकार तर करण्यात आली नाही या बाजूने वनाधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली. परंतु मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची उत्तरीय तपासणी केल्यावर त्याचा मृत्यू भुकेमुळे झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या बिबट्याची उत्तरीय तपासणी आमगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. कोटांगले व डॉ. रहांगडाले यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच आमगाव येथील वनपरिक्षेत्रधिकारी अभिजित इलमकर, क्षेत्रसहायक टी.बी.राऊत, वनरक्षक नितीन लांजेवार, ढगे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांना गोंदियावरून पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या समोरच पंचनामा करून उत्तरीय तपासणी करण्यात आली. हा बिबट तीन ते साडेतीन वर्षाचा असल्याचे सांगितले जाते. २ फेब्रुवारीच्या पहाटे त्या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असे पशुधन विकास अधिकाऱ्याने सांगितले.