लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाचा तीव्र कडाका अजून वाढायचा बाकी असतानाच लिंबांच्या दराने बाजारात धुमाकूळ घातला आहे. सध्या किरकोळ बाजारात एका लिंबाचा भाव चक्क ५ रुपये झाला आहे! उन्हाळा अजून वाढायचा आहे, मग एप्रिल-मे महिन्यात हे दर कुठपर्यंत जातील, याचा विचारच न केलेला बरा.
उन्हाळ्यात लिंबू सरबत, उसाचा रस आणि इतर थंड पेयांना मोठी मागणी असते. त्यामुळे बाजारात लिंबांची विक्री झपाट्याने वाढत आहे. सध्या वातावरण गरम होत असले, तरी प्रखर उन्हाळा अजून सुरू झालेला नाही. तरीही घाऊक बाजारात लिंबांच्या किमती वाढल्याने किरकोळ बाजारात एका लिंबाची किंमत ५ रुपये प्रति नगवर गेली आहे. परिणामी, लिंबू सरबताचा गोडवाही आता महागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. लिंबूचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांकडून मागणीही कमी होत आहे.
किंमत आणखी वाढण्याचा अंदाजसध्या उन्हाळ्याचा प्रभाव पूर्ण जाणवत नसतानाही लिंबांचे दर आकाशाला भिडत आहेत. पुढील काही आठवड्यांत तापमान वाढल्यानंतर लिंबांच्या मागणीत अजून मोठी वाढ होईल.
लिंबांचे सध्याचे दर१२०-१३० रुपये किलो घाऊक बाजार ५ रुपये प्रति लिंबू किरकोळ बाजार
या कारणांनी वाढले आहे बाजारपेठेत लिंबांचे दर
- उत्पादन घटले - यंदा लिंबांचे उत्पादन तुलनेने कमी झाले असून, बाजारात आवक कमी आहे.
- मागणी वाढली - रसवंतीगृहे, हॉटेल्स आणि थंडपेय विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे.
- वाहतूक खर्च वाढला - इंधन दरवाढ आणि वाहतूक खर्चामुळे शेतकऱ्यांपासून बाजारात येणाऱ्या लिंबांच्या किमतीवर परिणाम झाला आहे.
- नैसर्गिक आपत्तींचा फटका -अवकाळी पाऊस, गारपीट आणि हवामान बदलामुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारपेठेत लिंबाची आवक घटली असून त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.
"बाजारात लिंबांची आवक खूप कमी आहे, तर मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, दर वाढले आहेत. उन्हाळा जसजसा तीव्र होईल, तसतसे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे."- मनोज रहांगडाले, भाजीपाला विक्रेता