बाराभाटी : स्थानिक परिसर व आजूबाजूच्या गावातील मजूर हे तेंदूपत्ता कामासाठी आपला परिसर सोडून परराज्यात गेले आहेत. स्थानिक परिसरात रोजगार मिळत नसल्यामुळेच स्थानिक मजुरांवर दरवर्षी हीच पाळी येते. जवळील बऱ्याच गावामधील मजूर स्वत:च्या पोटावर आणि कुटुंबावर उपासमारीची टांगती तलवार येवू नये म्हणून रोजगारासाठी परराज्यात दाखल झाले आहेत. गावामध्ये कोणतेही काम नाही. रोजगार नाही आणि रोजगार हमी योजना तर या वेळी गावामधील पदाधिकारी वर्गाने दाबून धरली आहे. रोहयोची कामे सुरू करण्यासाठी ग्रा.पं. कार्यालयाची मान्यता लागते. गावाचा विकास करण्यासाठी ज्यांना निवडून देवून पदाधिकारी बनविण्यात आले, आता तेच पदाधिकारी त्या भोळ्या नागरिकांबरोबर अन्याय करताना दिसत आहेत. साधी रोजगार हमी सुरू योजनेची कामे सुरू करायला परवानगी मिळत नाही. आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीव्दारे मिळणाऱ्या योजना स्वत:च्या घशात घालतात. गाय दत्तक पालक योजनेसारख्या अशा किती तरी लहान-मोठ्या योजनांचा आता पत्ताच लागत नाही. लोकप्रतिनिधी, गावातील पदाधिकारी विकासाच्या नावावर केवळ बोंबा हाकलण्याचेच काम करताना दिसतात. मजुरांची भटकंती होवू नये यासाठी गाव परिसरात रोजगार उपलब्ध करून दिले जात नाही. उलट चांगल्या रस्त्यावर स्वत:चे पोट भरण्यासाठी सिमेंट रस्ता तर ज्या ठिकाणी आवश्यकता नाही तिथे मुरूमासह माती वापरून रस्ता तयार केला जातो. रस्ता महत्वाचा की रोजगार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वन-वन भटकणाऱ्या मजुरांच्या अजिबात विचारच केला जात नाही. रोजगारासाठी मजूर आपले घर सोडून बाहेर वेगळ्या पध्दतीचे जीवन जगून स्वत:चे जीवन सावरण्याचा प्रयत्न करतो.या परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येरंडी, देवलगाव, डोंगरगाव, कवठा, बोळदे, कुंभीटोला, चापटी, सुरगाव येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
तेंदूपत्ता कामासाठी परिसरातील मजूर रवाना
By admin | Updated: May 17, 2015 01:44 IST