गोंदिया : शहरात फक्त एकच बाग असल्याने नागरिकांकडून बागेसाठी मागणी केली जात आहे. अशात मात्र नगर परिषद प्रशासनाकडून कृष्णपुरा वॉर्डातील बागेच्या जागेवर आता लॉन तयार करण्याचे ठरविण्यात आले आहे. अगोदरच शहरातील दोन बाग मातीत मिळाले असून फक्त जागाच शिल्लक आहे. त्यात आता एका बागेच्य जागेवर लॉन साकारले जाणार असल्याने नगर परिषद कर्मशियल बनत असल्याचे दिसून येत आहे. शहरात सिव्हील लाईन, कृष्णपुरा वॉर्ड व रेलटोली परिसरात बाग होते. आजघडीला मात्र फक्त सिव्हील लाईंन परिसरातील सुभाष बागच जिवीत आहे. तर कृष्णपुरा वॉर्ड व रेलटोली परिसरातील बाग उजाडले असून फक्त पडीत जागाच शिल्लक आहे. शहरातील वाढते प्रदूषण व दिवसभराची कामे आटोपल्यावर नागरिकांना शुद्ध हवा व वातावरणासाठी फक्त सुभाष बागच उरले आहे. यामुळेच नागरिकांचा कल बागेकडे वाढत चालला आहे. सकाळ व सांयकाळ दोन्ही वेळेस सुभाष बाग भरगच्च होऊन जाते. शहरात अन्यत्र बाग नसल्याने दूरवरून लोकांना सुभाष बागेत यावे लागते. अशात कृष्णपुरा वॉर्ड व रेलटोली परिसरातील बागेच्या जागा पडलेल्या असल्याने त्यावर पुन्हा बाग फुलविण्याची मागणी शहरवासी करीत आहेत. असे झाल्यास त्यांना आपापल्या परिसरातच शुध्द वातावरणात काही वेळ घालविता येणार. नगर परिषद प्रशासन मात्र या विपरीत कार्य करीत आहे. नागरिकांच्या मागणीला बगल देत नगर परिषद कृष्णपुरा वॉर्डातील बागेच्या जागेवर आता लॉन तयार करण्याच्या तयारीत आहे. बागेच्या या जागेवर मध्यंतरी वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून सुरक्षा भिंत व पायवाटचे काम करण्यात आले आहे. अशात थोडीफार मेहनत घेतल्यास या जागेवर पुन्हा बाग फुलविता येईल. परिसरातील नागरिक व चिमुकल्यांनाही त्याचा चांगलाच लाभ मिळणार. याउलट मात्र नगर परिषद या जागेवर लॉन साकारणार आहे. भविष्यात तयार होणारे हे लॉन विविध कार्यक्रमांसाठी भाडे तत्वावर उपलब्ध करविले जाणार आहे. विशेष म्हणजे यातही हे लॉन वार्षिक भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून ठरवून दिलेल्या दरानेच ते नागरिकांना उपलब्ध करवून दिले जाईल. तर या लॉनची संपूर्ण देखभाल व दुरूस्ती संबंधित कंत्राटदाराकडे राहणार असल्याचे नगर परिषदेने ठरविले आहे. नगर परिषदेच्या या कर्मशियल दृष्टिकोनातून नगर परिषदेची आवक वाढणार आहे. तोट्यात असलेली नगर परिषद हा प्रयोग करून एक चांगले पाऊल उचलत आहे. मात्र यासाठी बागेची जागा वापरणे हि बाब योग्य नाही. (शहर प्रतिनिधी)
बागेच्या जागेवर साकारले जाणार लॉन
By admin | Updated: May 13, 2014 23:37 IST