गोंदिया : संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची धुरा असलेल्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालय व्यवस्थापन भंडारा येथील घटनेनंतरही जागे झालेले नाही. या दोन्ही रुग्णालयांतील इलेक्ट्रिक स्वीचची झाकणे गायब झाली असून, विद्युत तारादेखील उघड्या पडल्या आहेत, त्यामुळे एखाद्या वेळेस शाॅर्टसर्किट होऊन रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ११) लोकप्रतिनिधीने शहरातील केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असता ही धक्कादायक बाब पुढे आली. ही दोन्ही रुग्णालये जिल्ह्यावासीयांसाठी ऑक्सिजन आहेत; पण या दोन्ही रुग्णालयांची अवस्था पाहता विदारक वास्तव पुढे आले. बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेशातील रुग्णसुद्धा उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे तीनशे ते चारशे रुग्ण नेहमीच दाखल असतात. या रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट झाले असले तरी या रुग्णालयातील अनेक इलेक्ट्रिक स्वीच बाॅक्सची झाकणे गायब आहेत. विद्युत तारा उघड्या असून, काही इलेक्ट्रिक बोर्डदेखील लोंबकळत असल्याचे आढळले. इलेक्ट्रिक स्वीच बाॅक्स उघडे असल्याने कधी विद्युत तारा तुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर हीच परिस्थिती केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाची आहे. सध्या याच रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार चालविला जात आहे. या रुग्णालयातीलसुद्धा इलेक्ट्रिक स्वीच बॉक्स उघडे पडले असून, रुग्णालयाच्या बाहेरील विद्युत तारा उघड्याच असल्याचे आढळले. त्यामुळे एखाद्या वेळेस मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता रुग्णालयाचे इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट झाल्याचे ते सांगतात; मात्र नेमके काय केले हे त्यांनाच माहिती नाही.
.......
जीर्ण इमारतीतून कारभार सुरू
बीजीडब्ल्यू रुग्णालयाची जुनी इमारत १९३९ मध्ये तयार करण्यात आली. या इमारतीला ८२ वर्षे पूर्ण झाली असून, ही इमारतसुद्धा पूर्णपणे जीर्ण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचल्यानंतर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात ही इमारत वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल दिला होता; पण यानंतरही या इमारतीतून कारभार सुरू असून, गर्भवती महिला आणि लहान बालकांवर या ठिकाणी उपचार केले जातात.
......
घाणीचे साम्राज्य
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरापेट्या तुडुंब भरल्या आहेत. रुग्णांचा वावर असलेल्या ठिकाणी सांडपाणी साचून डबके तयार झाले आहे, तर या परिसरात डुकरांचासुद्धा वावर दिसून आला. या घाणीमुळे येथे येणारा रुग्ण बरा होण्याऐवजी आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.