व्यापाऱ्यांची धम्माल : मार्केटिंग फेडरेशनचे केवळ ११ खरेदी केंद्र सुरूगोंदिया : खरीप हंगामाचे धान विक्रीसाठी उपलब्ध असतानाही जिल्ह्यात हमीभाव धान खरेदी केंद्राचा तिढा अजूनही कायम आहे. सहकारी संस्थांनी अद्यापही धान खरेदी सुरू न केल्यामुळे व्यापाऱ्यांची धम्माल सुरू असून शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावापासून वंचित राहावे लागत आहे.आदिवासी विकास महामंडळाकडे अनेक सहकारी संस्थांनी धान खरेदीसाठी प्रस्ताव दिले होते. यापैकी ३५ संस्थांना धान खरेदीची मंजुरीही देण्यात आली होती. मात्र अद्यापही या संस्थांनी धान खरेदीस सुरूवात केली नाही. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय धान खरेदी सुरू करणार नाही, अशी भूमिका या संस्थांनी घेतली आहे. आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापन जे.पी. राजूरकर यांनी सांगितले की, संस्थांनी पाठविलेल्या प्रस्तावानंतरच त्यांना धान खरेदीची मंजुरी देण्यात आली आहे. परंतु आता कमिशन मिळत नाही, धानाची लवकर उचल होत नाही, अशी कारणे पुढे करून संस्थांनी धान खरेदीला नकार दिला आहे. तरीसुद्धा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत केवळ तीन आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. पाच धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली, मात्र देवरी, चिचगड व कोहमारा या तीनच ठिकाणी प्रत्येकी एकेक धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. मात्र उर्वरित केंद्र कधी सुरू होतील? हे सध्या गुलदस्त्यातच आहे. महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने मागील काही दिवसांत जिल्ह्यात केवळ ११ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मार्केटिंग फेडरेशनला ४६ धान खरेदी केंद्र सुरू करावयाचे होते. मात्र मोरगाव-अर्जुनीमध्ये तीन तर नवेगावबांध, गोरेगाव, कुऱ्हाडी, आमगाव, काचेवाही, मेंढा व बघोली येथे प्रत्येकी एक अशा केवळ ११ केंद्रांवरून धान खरेदी सुरू आहे. काही दिवसांतच आणखी काही केंद्र सुरू होणार आहेत, असे मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक जी.टी. खर्चे यांनी सांगितले.आदिवासी विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरपासून धान खरेदी केंद्र सुरू करण्याची शासनाने घोषणा केली होती. ६ व ७ नोव्हेंबरपर्यंत सर्व संस्थांना व केंद्रांना धान खरेदीसाठी आदेशही देण्यात आले होते. महामंडळाला ३५ धान खरेदी केंद्र सुरू करावयाचे होते. परंतु १० नोव्हेंबरपर्यंत एकही धान खरेदी केंद्र उघडण्यात आले नाही. त्यामुळे दिवाळीसाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसा आलाच नाही. काही शेतकऱ्यांनी हताश होऊन व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकला. आता दिवाळीनंतर धान खरेदी केंद्र उघडण्याच्या संख्येत काहीशी भर पडल्याचे दिसून येते, पण अजून हा तिढा कायम आहे. (प्रतिनिधी)
संस्थांची नकारघंटा कायम
By admin | Updated: November 19, 2015 02:13 IST