साखरीटोला : जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा रामपूर (पानगाव) येथील मुख्याध्यापिका ए.एच. पोहनकर यांनी शालेय व्यवस्थापन कार्यात अनियमितता व अनेक चुका केल्याने त्यांच्या कारभाराची त्वरीत चौकशी करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांचेकडे केली आहे. दि. १८ डिसेंबर २०१४ ला शालेय व्यवस्थापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती जि.प. गोंदिया, महिला व बालकल्याण सभापती खंडविकास अधिकारी आमगाव, गटशिक्षणाधिकारी आमगाव यांचेकडे मुख्याध्यापिका पोहनकर यांचेवर विविध आरोप लावून तक्रार केली. शालेय भेट रजिस्टरमधील पान क्र. ३३ व ३४ फाडले आहे. शालेय प्रोसीडींग रजिस्टरमध्ये योगराज तरोणे या सदस्याची खोटी स्वाक्षरी केली आहे. सभा घेण्यापूर्वीच ठराव रजिस्टरवर ठराव लिहून घेतात. तेलाचे ८ पॉकेट विकल्याची नोंद आहे. दि. १३ जानेवारी २०१४, १७ फेब्रुवारी २०१४, १४ जुलै २०१४ या तिन्ही दिवसात मुख्याध्यापिका रजेवर होत्या. मात्र काही दिवसानंतर शिक्षक हजेरीवरील रजेची नोंद खोडतोड करून स्वाक्षरी केली. ठराव स्वत:च्या मर्जीने मंजूर करून घेतात. दि. २४ फेब्रुवारी २०१४, २५ मार्च २०१४ व दि. २६ एप्रिल २०१४ या तिन्ही दिवसाची शाळा व्यवस्थापन समितीच्या कोणत्याही सदस्यांची उपस्थित असल्याची स्वाक्षरी नसतांना सर्वच ठराव पारित केले आहे, असे विविध आरोप सदर मुख्याध्यापिकेच्या आहे. भोंगळ कारभाराची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टेकचंद बहेकार, उपसरपंच दुर्वास दोनोडे, योगराज तरोणे, श्रीराम जनबंधू, दिपा देवगिरे, संगीता सरोजकर यांनी केला आहे. (वार्ताहर)
मुख्याध्यापिकेच्या कारभाराची चौकशी करा
By admin | Updated: January 17, 2015 01:52 IST