गोंदिया : गावातील शासनाचा प्रतिनिधी म्हणजे पोलीस पाटील असतो. परंतु हा पोलीस पाटील गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलीसांना देत नसल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावते. परिणामी अवैध धंद्याला चालना मिळते. पोलीस पाटील गावातील अवैध धंद्यांची माहिती लपवितात असा सूर नागरिकांचा आहे.गावात शांतता नांदून सर्वत्र सुबत्ता नांदावी, अशी सर्वानची अपेक्षा असते. गावात वास्तव्य करणाऱ्या विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये एकोपा नांदत राहावा यासाठी गावातील सृजन नागरिक प्रयत्नही करतात. गावात काही असामाजिक तत्वांचा शिरकाव झाल्याने गावात अवैध धंद्याला ऊत येते. या अवैध धंद्यामुळे गावात अराजकता पसरते व त्यातूनच भांडण-तंटे निर्माण होते.ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी पंचायत राजच्या माध्यमातून ग्राम पंचायतमध्ये सरळ निधी येतो. स्थानिक स्वराज्य संस्था ग्राम पंचायतच्या माध्यामातून गावात मूलभूत सोयी उपलब्ध करून सार्वजनिक कार्याला गती दिली जाते. गावातील आपसामधील भांडण-तंटे गावातच मिटवून गावात शांतता अबाधित राखण्यासाठी गावात असलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती प्रयत्न करते. गावातील भांडण तंटे सामोपचाराने सोडविण्याबरोबर गावातील अवैध धंद्यावर आळा घालण्याचा प्रयत्न महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती करीत असते. परंतु काही गावातीलच तंटामुक्त समित्या या अवैध धंद्यांच्या विरोधात एल्गार पुकारतात. परंतु बहुतांश गावातील तंटामुक्त गाव समित्या अवैध धंद्दे बंद करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. अवैध धंदे करणाऱ्यांसोबत आपले वैर का करावे असे गृहीत धरून अनेक तंटामुक्तीचे पदाधिकारी अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करीत नाही. परंतु पोलीसांच्या सहकार्यासाठी शासनाने प्रत्येक गावात पोलीस पाटलाची नियुक्ती केली. पोलीसांचे काम अवैध धंद्यावर आळा घालण्याचे आहे. मग या अवैध धंद्दे करणाऱ्यांची माहिती पोलीस पाटील पोलीसांना न देता का दडवतात असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. गाव व शासन यातील दुवा समजला जाणारा पोलीस पाटील अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी कवडीचेही प्रयत्न करीत नाही. गावात कश्या प्रकारचे अवैध व्यवसाय चालते याची इतंभूत माहिती पोलीस पाटलांना असते. मात्र या धंद्यांची माहिती ते पोलीसांपर्यंत का पोहचवित नाही हे न सुटणारे कोडे आहे. पोलीस पाटील पोलीसांना मदत करण्यासाठी नसून फक्त मानधन उचलण्यापुरतेच राहीले असल्याची टिका काही लोकांकडून ऐकीवात येते. पोलीस पाटलांनी अवैध धंद्यांना गावातून नायनाट करण्याचा चंग बांधल्यास गावात शांतता नांदायला वेळ लागणार नाही, असाही नागरिकांचा सूर आहे. (तालुका प्रतिनिधी)
पोलीस पाटील दडवतात अवैध धंद्यांची माहिती
By admin | Updated: October 29, 2014 22:52 IST