गोंदिया : मांगल्याचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळीचा सण आता जेमतेम आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळेच दिवाळीच्या खरेदीनिमित्ताने बाजारातील वर्दळ वाढली आहे. दिवाळीमुळे रविवार सुटीच्या दिवशीही बाजार सुरू आहेत. लवकरात लवकर खरेदी करून मोकळे व्हावे या दृष्टीने आतापासूनच बाजार गर्दीने खचाखच भरून गेले आहे.२१ तारखेला दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी आहे. या दिवशी लोकं सोने खरेदी करतात. त्या दिवशी सोने घडवून मिळावे यासाठी गोंदियाकर आताच ‘आॅर्डर’ देऊन ठेवत आहेत. सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी हा भाव यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. हि शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सराफा दुकानात एकच गर्दी केली आहे. शिवाय दिवाळीनिमित्ताने अनेकांनी घरच्या रंगरंगोटीचे काम काढले आहे. त्यासाठी रंगांच्या, हार्डवेअरच्या दुकानातही चांगली गर्दी दिसून आली. ब्रॅण्डेड कंपनीच्या रंगांना बाजारात चांगलीच मागणी आहे. या साऱ्या घाईगर्दीत नागरिकांनी कपडे खरेदीसाठीही एकच गर्दी केली आहे. बाजारात रेडिमेड कपड्यांच्या दुकानात सध्या पाय ठेवायला जागा नाही. दिवाळीची ही गर्दी लक्षात घेता दुकानदारांनी आधीच कपड्यांचा माल बोलावून ठेवला होता. दोन दिवसानंतर पुन्हा गर्दी होणार, असे लक्षात घेता अनेकजण आतापासूनच खरेदी करीत आहे. रांगोळ्या, आकाशदिवे, मातीचे दिवे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गाड्या खरेदी आदींसाठीही गोंदियाकरांनी गर्दी केली आहे. धनत्रयोदशीचा मुहूर्त खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्या मुहुर्तावर वस्तू घरात यावी, यासाठी लोकं आतापासूनच त्याची बुकिंंग करीत आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शो-रूममध्ये यासाठी चांगलीच गर्दी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील नागरिक धुमधडाक्याने दिवाळी साजरी करण्याच्या तयारीला लागले आहेत. विविध साहित्याच्या विक्रीच्या दुकानाबरोबरच विविध फटाक्यांची दुकानेही शहरात सजली आहेत. उल्लेखनीय म्हणजे काही नवीन प्रकारचे प्रदूषणमुक्त फटाके यंदा गोंदियाच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. यामुळे लहान बालकांसाठी ही दिवाळी पर्वणीच ठरणार यात शंका नाही. गोंदिया शहर दिवाळीनिमित्त खरेदी विक्रीसाठी गजबजलेले दिसत आहे. रांगोळी, मातीचे दिवे, मूर्ति याबरोबरच नवनवीन विविधरंगी फटाके विक्रीस उपलब्ध झाले आहेत. बाजार परिसरात अनेक दुकाने फटाक्यांनी सजली आहेत. यात सीताराम चौरसिया, बेनिमाधो चौरसिया व शर्मा फटाका भंडार या दुकानांमध्ये विविधरंगी प्रदूषणमुक्त फटाके विक्रीस उपलब्ध झाले आहेत. सदर प्रतिनिधीने या दुकानांत भेट दिली असता, यंदा बाजारात क्रेकडोवा, मॅजीक साप, मल्टीकट, आयटम, रंगीत फुलझडी व रंगीत फॅन्सी अनार इत्यादी नविन प्रदूषणमुक्त फटाके बालकांकरिता उपलब्ध झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. यासोबतच अन्य फटाक्यांसहित आकाश फटाक्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे सांगण्यात आले. हे फटाके आकाशात झेप घेऊन आकाशात सतरंगी छटा निर्माण करीत असतात. त्यातही ते प्रदूषणमुक्त असल्याचे चौरसिया यांनी सांगितले. दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा सण असतो. बालकांसाठी तर दिवाळी म्हणजे एक मोठी पर्वनीच असते. हा कालखंड त्यांच्यासाठी आनंद व उत्साहाचे वातावरण घेऊन येत असते. हा उत्साह ते फटाके फोडून व्यक्त करतात. मात्र फटाक्यांमुळे वातावरणात प्रदूषण पसरत असते. यंदा प्रदूषणमुक्त फटाके बाजारात उपलब्ध झाल्याने बालकांचा आनंद द्विगुणीत तर झालाच तसेच सदर प्रदूषणमुक्त फटाके फोडल्याने वातावरणात प्रदूषण निर्माण होणार नाही, पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाही हे विशेष. (शहर प्रतिनिधी)
दिवाळीनिमित्ताने बाजारात वाढली गर्दी
By admin | Updated: October 14, 2014 23:20 IST