देवानंद शहारे - गोंदियामहसूल व वन मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार १२ डिसेंबर २०१३ रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले. तेव्हापासून या ठिकाणी पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली आहे. जंगलचा राजा म्हटल्या जाणाऱ्या वाघासोबतच इतर प्राण्यांचे आकर्षण सर्वांना वाटू लागले आहे. यातून वनविभागाच्या महसुलात दिवसागणित वाढ होऊ लागली आहे.१ आॅक्टोबर ते १५ जूनदरम्यान हे क्षेत्र पर्यटनासाठी खुले करण्यात येते. यात नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य व कोका अभयारण्याचा समावेश आहे. तेव्हापासून येथे पर्यटकांच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे. गोंदियात १९९९ पासून वनविभाग (वन्यजीव) कार्यालय कार्यरत झाले. या विभागाची श्रेणीवाढ होवून ११ नोव्हेंबर २०११ पासून वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी येथे कार्यरत आहेत. आता या कार्यालयाचे नामांतर होवून वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया असे करण्यात आले आहे. पर्यटकांनी गैरसोयीसाठी इंटरनेटवरून बुकींग करावी असे वनाधिकारी सूचवितात.
पर्यटकांसह महसुलातही वाढ
By admin | Updated: January 24, 2015 22:56 IST