जिल्हाधिकारी सैनी : विस्तारीत समाधान शिबिरगोंदिया : शासनस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावल्याशिवाय विकास होणार नाही. सर्व स्तरातील नागरिकांनी याबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी व्यक्त केले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान योजना शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. आमगाव तालुक्यातील ग्राम रिसामा येथील विजयालक्ष्मी सभागृहात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, माजी आ. केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, पंचायत समिती सभापती हनुवंत वट्टी, आमगाव सरपंच पद्मा चुटे, रिसामा सरपंच निर्मला रामटेके, बनगाव सरपंच सुषमा भूजाडे, कुंभारटोली सरपंच त्रिगुणा मेश्राम, उपविभागीय अधिकारी दुर्गेश सोनवाने, उपजिल्हाधिकारी (महसूल) मनकवडे, जिल्हा पुरवठा अधिकारी काळे उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.सैनी यांनी, शेतकरी बांधवांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत रबी पिकांचे नियोजन, शेतकरिता पाण्याचे नियोजन, विविध तंत्रज्ञानाचा अवलंब, त्याचप्रमाणे मत्स्यव्यवसाय व शेतीपूरक व्यवसायांकडे लक्ष पुरविणे आवश्यक असल्याचे सांगितले. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, याकरिता शासकीय योजना गुणवत्तापूर्ण व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येतात. कामगार कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या योजना, विविध दाखले देण्याकरिता शिबिरांचे आयोजन, फेरफार अदालती इत्यादी शिबिरांच्या माध्यमातून कार्यालयीन जुन्या दस्तावेजांची कायमस्वरुपी नोंदणी करण्यात येणार आहे असल्याचे सांगीतले. तर पुढे सात दिवसांमध्ये स्कॅनिंगचे काम संपूर्ण जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असून डिजीटल साईन सर्टिफिकेट योजनेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, आठ तालुक्यांमध्ये ग्रामस्तरावर निर्मित केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांनी दस्तावेज सादर करताना त्यांना दाखला व आधार कार्ड प्राप्त होईल. या पद्धतीने सहा ते सात हजार नागरिकांना दाखल्याचे वाटप झाले. तर मागील वर्षी विविध प्रकारच्या २६ हजार दाखल्यांचे वाटप करण्यात आले असून आधार नोंदणीमध्येही जिल्हा अग्रेसर असल्याचे ते म्हणाले.शिवणकर यांनी यावेळी सांगितले की, समस्या आपल्यामुळेच निर्माण होत असतात. नागरिकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी म्हणजे समस्या उद्धभवणारा नाही. गावाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये ग्रामसभा, चावडी वाचनाचा लाभ गावकऱ्यांनी घ्यावा, त्यामुळे योजनांची माहिती होते. सातबारा, फेरफार, वनजमिनीचे पट्टे वाटप यासारख्या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला विकास साधावा.यावेळी जननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत धनादेशाचे वाटप, शेतकरी लाभार्थ्यांना स्प्रेपंप, युरीया खताचा वाटप, अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरेलू कामगार कल्याण मंडळ योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप, वनविभागाकडून गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये पोलीस विभाग, कृषी विभाग, भूमि अभिलेख, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सेविका, महावितरण या विभागांची विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. लोकसंख्येचा भस्मासूर या विषयावर पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आले.कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शासकीय योनजांचा लाभ घेऊन जीवनमान उंचवावे
By admin | Updated: August 3, 2014 00:10 IST