गोंदिया : रेतीची तुटलेली पाटर्नरशिप आणि रखडलेल्या आर्थिक व्यवहाराला घेऊन शहरातील रिंगरोडवरील सहयोग हॉस्पिटल परिसरात धारदार शस्त्राने वार करून रविप्रसाद राधेलाल बंभारे (३५) रा. लोधीटोला याचा खून करण्यात आला. या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या पोलीस कोठडीत रविवारपर्यंत (दि.२४) वाढ करण्यात आली आहे.
शहरातील पोस्टमन चौक सरस्वती शाळेजवळ राहणारा आरोपी श्याम ऊर्फ पीटी रमेश चाचेरे (३२), कुंभारटोली येथील प्रशांत उर्फ छोटा कालू मातादीन ज्ञानेश्वर भालेराव (३०), गौशाला वॉर्डातील शुभम गोपाल चव्हाण ऊर्फ परदेशी (२९) व शाहरूख रज्जाक शेख (२३,रा. मदीना मस्जीद मागे, गौतम नगर) या चौघांना रवि बंभारे यांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला या चारही आरोपींना जिल्हासत्र न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती; मात्र शुक्रवारी पुन्हा जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठीड वाढवून दिली आहे. या चार आरोपींवर विविध प्रकारचे ३२ गुन्हे दाखल आहेत. तपास ठाणेदार प्रमोद घोंगे करीत आहेत.