केशोरी : कितीही उच्चशिक्षण घेतले, परदेशात नोकरी केली, पण मातृभूमीचा मोह काही केल्या जात नाही. असाच प्रसंग अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गवर्रा गावात घडला. अमेरिकेत नोकरी करणारे साफ्टवेअर इंजिनिअर सुधीर लोथे यांना आपल्या मूळ गवर्रा गावी भेट देऊन लहान-सहान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.सुधीर कुंडलिक लोथे हे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गवर्रा गावचे मूळ रहिवाशी. ते सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून अमेरिकेत नोकरीवर आहेत. मात्र वर्षातून एकदा ते गावाला निश्चित भेट देतात. यावर्षी त्यांनी १७ जानेवारीला गावाला भेट दिली. गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पामुळे शाळेचा झालेला विकास पाहून ते भारावून गेले. शाळेचा आकर्षण मनात असल्यामुळे त्यांनी गावच्या जि.प. प्राथमिक शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांशी हितगूज साधली. जन्मगावच्या प्रेमापोटी ते दरवर्षी गवर्रा येथे येतात. आदर्श ठरू पाहणाऱ्या गावच्या शाळेची माहिती त्यांना नागरिकांकडून मिळाली. गर्भश्रीमंत कुटुंबात वाढलेले सुधीर लोथे यांनी आपले उच्चशिक्षण नागपूर, पुणे यासारख्या शहरात पूर्ण केले. २० वर्षापासून ते सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून अमेरिकेत नोकरीत आहेत. यावर्षी ते आपल्या दोन मुलांसह सपत्नीक गावाला आले. गावच्या शाळेचा उत्कर्ष पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला. मुख्याध्यापक पी.एन. जगझापे, शिक्षक बी.एस. गहाणे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी शाळेला भेट देण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यांना आदरासह शाळेत आमंत्रित करण्यात आले. लहान-सहान विद्यार्थ्यांशी हितगूज साधत अमेरिकेतील जीवनमान, शिक्षण पद्धती व छोट्याछोट्या गोष्टी सांगून विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची आवड जाणून घेतली. विचारलेल्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी दिलेले योग्य उत्तरे बघून त्यांनी कौतुक केले. तसेच नोटबुक, पेन, पेन्सिल, शार्पनर, ईरेजर आणि अमेरिकेतील चॉकलेट भेटस्वरूप दिले. ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा झालेला विकास आणि आदर्श शाळा कशी ठरू शकेल, याबाबत मुख्याध्यापकांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलेल्या सूचनांची नोंद करून शाळेच्या हितासाठी जवढे चांगले करता येईल, तेवढे प्रयत्न करेन, असे मुख्याध्यापकांना आश्वासन दिले. (वार्ताहर)
उच्चशिक्षित बनण्यासाठी ुविद्यार्थ्यांना दिले प्रोत्साहन
By admin | Updated: January 22, 2015 01:35 IST