बोअरवेल्सची दुरूस्ती सुरू : नगर परिषदेला उशिरा आली जागगोंदिया : शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली असून सर्वांना शहरातील विहिरी व बोअरवेल्सवर धाव घ्यावी लागत आहे. त्या जलस्त्रोतांची देखभाल दुरूस्ती होत नसल्यामुळे नागरिकांनी फजिती होत आहे. आधीच नगर परिषदेकडून दुरूस्त व स्वच्छता करण्यात आली असती तर या पाणी टंचाईचा सामना करण्यात अडचणी गेल्या नसत्या, मात्र आता ऐन पाणी टंचाईच्या काळात बोअरवेल्स दुरूस्तीचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे.शहरात नगर परिषदेच्या ७०० बोअरवेल्स आहेत. त्यातील बऱ्याच चांगल्या असल्या तरी काही खराब आहेत. त्या युद्धस्तरावर दुरूस्ती केल्या जात आहे. नगर परिषदेजवळ दोन पाणी टँकर आहेत. परंतु ट्रॅक्टर एकच असल्यामुळे दोनपैकी एकाच पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीत भाड्याने एक ट्रॅक्टर घेऊन दोन्ही टँकरंद्वारे गरजूंना पाणी पुरवठा करणे गरजेचे झाले आहे. नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन लोकांना बोअरवेल्स दुरूस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे. मागील १५ दिवसांत जवळपास ७५ बोअरवेल्स दुरूस्त करण्यात आल्या आहेत. शहरात ७०० बोअरवेल्ससह नगर परिषदेच्या ५२ विहिरी आहेत. त्या सर्वांमध्ये पंप हाऊस लावले आहेत. पंपाद्वारे टाक्यांमध्ये पाणी भरण्यासाठी कर्मचारी नियुक्त आहेत. या पंपहाऊसचे निरीक्षण केल्यावर ते काम करीत असल्याचे दिसून येते, मात्र रखरखाव नसल्याचे स्पष्ट दिसून येते.छोटा गोंदियाच्या चावडी चौकातील पाणी टाकीच्या भिंतीमध्ये वडाचे लहान रोपटे उगवले आहे. हे रोपटे मोठे होवून पाणी टाकीला नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. त्यांना योग्यवेळी कापून घेणे गरजेचे आहे. गोरेगाव चौकातील विहिरीचे पाणी पूर्वी नागरिक पिण्यासाठी उपयोगात आणत असत. परंतु सध्याच्या दिवसांत या विहिरीचे पाणी एवढे घाण आहे की पाणी पिणे तर दुर त्या विहिरीकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. त्या विहिरीच्या आतसुद्धा झाड उगविले आहेत. हे लहान झाड विहिरीला नुकसान करू शकते.प्रत्येक वर्षी मे महिन्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाण्याची कपात केली जाते. अशात नगर परिषदेने विहिरी व पाणी टाकींची स्वच्छता व देखभालीकडे वेळेपूर्वीच लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणीसुद्धा आहे. सूर्याटोला आंबेडकर चौक येथील रहिवाशांनी नगर परिषद पाणी विभागात त्यांच्या परिसरातील पंप खराब झाल्याचे सांगितले. न.प. कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत दुरूस्त करू असे सांगितले आहे.(प्रतिनिधी)
शहरातील पेयजल स्रोत झाले दुर्लक्षित
By admin | Updated: May 19, 2016 01:22 IST