लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीला सुरुवात झाली असली तरी धान खरेदी केंद्रावरील गोंधळ काही संपण्याचे नाव घेत नाही. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर सध्या बारदान्याचा तुटवडा असून, सोमवारपर्यंत (दि.१२) पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे सोमवारी बारदाना न आल्यास धान खरेदी पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदीला जिल्ह्यातील एकूण १४९ केंद्रांवरुन सुरुवात झाली आहे. खरिपातील धान कापणी आणि मळणीची कामे जवळपास आटोपत आली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर धानाची आवक वाढली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभाव आणि बोनस मिळत असल्याने बहुतेक शेतकरी याच धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करतात. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत ८ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. केंद्रावर आता धानाची आवक वाढली असताना बारदान्याचा तुटवड्याची समस्या निर्माण झाली आहे. शासनाकडून बारदान्याचे टेंडर वेळेत न झाल्याने केंद्रांना वेळेत बारदान्याचा पुरवठा होऊ शकला नाही. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप आणि रब्बी हंगामासाठी दीड कोटी बारदान्याची मागणी केली आहे. त्यातच सोमवारपर्यंत २५ हजार बारदान्याचा पुरवठा कोलकाता येथून होण्याची शक्यता आहे, तर सध्या दोन दिवस पुरेल एवढाच बारदाना उपलब्ध असल्याने सोमवारी बारदान्याचा पुरवठा न झाल्यास धान खरेदी पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.धान खरेदी केंद्रावर आवक वाढली असतानाच बारदान्याचा तुटवडा पडल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही केंद्रावर बारदान्याअभावी धान तसाच उघड्यावर पडून आहे. त्यामुळे या धानाचे नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी - शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी मागील वर्षांपासून शासनाने ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी आतापर्यंत १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तर नोंदणीपासून अनेक शेतकरी वंचित असल्याने शासनाने नोंदणी करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
गोदामांची क्षमता १५ लाख क्विंटल - जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत धान खरेदी केली जाते. खरेदी केंद्रावर खरेदी केलेले धान उघड्यावर राहून खराब होऊ नयेत यासाठी गोदामांची व्यवस्था केली आहे. यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १५ लाख क्विंटल क्षमतेच्या गोदामांची व्यवस्था केली आहे.
सोमवारी उपलब्ध होणार बारदानामागील तीन, चार दिवसांपासून शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे. सध्या दोन दिवस पुरेल एवढा बारदाना शिल्लक असून, सोमवारपर्यंत २५ हजार बारदाना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारदान्याची अडचण भासणार नाही.- अजय बिसेन, प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी