लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : १६ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लिंक फेल असल्याने जिल्ह्यातील हजारो उमेदवारांना नामांकन दाखल करता आले नाही. राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.निवडणूक आयोगाने यावर्षी आॅनलाईन पद्धतीने नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अवलंबली आहे. आदिवासी, नक्षलग्रस्त व ग्रामीण भागतील उमेदवारांची या प्रक्रियेमुळे चांगलीच दमछाक होताना दिसून आली. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी २२ ते २९ सप्टेंबरचा कालावधी निर्धारित करण्यात आला. सुरुवातीच्या काही दिवसांत तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र चालणार नाही, उपविभागीय अधिकाºयांच्या स्वाक्षरीचे हवे, शिवाय बारकोडेड जात प्रमाणपत्र पाहिजे असल्याच्या चर्चा परिसरात होत्या. त्यामुळे अनेकांनी सुरुवातीच्या काळात नामांकन दाखल केले नाही. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यातच बराच कालावधी निघून गेला. या संभ्रमामुळे अनेकांनी विना बारकोडेड जात प्रमाणपत्र सादर केले. नेमके ते कसे असायला पाहिजे, याविषयी मार्गदर्शनसुद्धा प्रशासनाकडून केले जात नव्हते.शेवटी उमेदवारांनी जे कागदपत्र उपलब्ध आहेत ते घेऊन शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकच गर्दी केली. मात्र शुक्रवारी दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लिंक फेल होती. शिवाय भारनियमनाचाही फटका बसला. आॅफलाईन आवेदन पत्र स्वीकारण्यासंदर्भातही संभ्रम होता. तरी काही उमेदवारांनी आॅफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली. लिंक फेल असल्याने नामांकन आॅनलाईन होत नव्हते. अशावेळी वेळ समाप्तीनंतरही साडे सहा वाजतापर्यंत नामांकन स्वीकारण्यात आले. दीड तासापर्यंत उशिरा नामांकन स्वीकारण्याचे आदेश होते काय, हा सुद्धा बचुकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. लिंक फेल असल्याची संधी साधून अनेक संगणक चालक गायब होते, अशीही ओरड आहे. लिंक फेल असल्याने ज्या उमेदवारांचे नामांकन होऊ शकले नाही त्यांनी आॅफलाईन नामांकन स्वीकारण्याची अट तहसीलदारांना घातली. मात्र त्यांनी तक्रारकर्त्यांना निवडणूक अधिकाºयांकडे पाठविले. त्यांनी उमेदवारांना पुन्हा तहसीलदारांकडे पाठविले. या टोलवाटोलवीमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. कार्यालय बंद झाल्यानंतरही रात्री ११ वाजेपर्यंत नामांकन दाखल करणारे उमेदवार वरांड्यात ठिय्या मांडून होते. अखेर त्यांचे नामांकन दाखल होऊ शकले नाही. निवडणूक आयोगाने जी वेळ नामांकनासाठी निर्धारित केली होती त्या कालावधीत तांत्रिक बिघाड येत असल्याने त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नामांकनासाठी मुदतवाढ देण्याची मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शेकडो उमेदवार नामांकनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 21:33 IST
१६ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लिंक फेल असल्याने जिल्ह्यातील हजारो उमेदवारांना नामांकन दाखल करता आले नाही.
शेकडो उमेदवार नामांकनापासून वंचित
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : लिंक फेलचा फटका