विजय मानकर सालेकसायेथील गडमाता मंदीर पहाडीच्या पायथ्याशी असलेला कुआढास नाल्यावरील पुलाने अनेकांचे बळी घेतले तर अनेकांना अपंग बनवून ठेवले. एवढेच नव्हे तर अनेक जनावरेसुद्धा बळी गेली. काही दुचाकी व चारचाकी वाहनसुद्धा अपघात होऊन क्षतीग्रस्त झाले आहेत. नेहमी अपघाताला आमंत्रण देणारा सदर पूल असूनसुद्धा याच पुलावरुन नाईलाजाने रोज ये-जा करावे लागते व जीव धोक्यात घातले जाते. मात्र प्रशासन या ठिकाणी लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन बघत आहे, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे. सालेकसा-नानव्हा मार्गावर असलेल्या या पुलावरुन सालेकसा मुख्यालयात आपल्या विविध कामांसाठी रोज नागरिक ये-जा करतात. तसेच या परिसरात शेतकरी वर्ग मुख्य पिकाव्यतिरिक्त काही नगदी पिकांचे उत्पादन घेतात. नाल्याच्या किणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतला जातो. त्याला विक्रीसाठी तालुक्याच्या बाजार पेठेत न्यावे लागते. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी विक्रीसाठी सालेकसा येथील रेल्वे स्टेशन व बस स्टँडला जाणारे लोकही या मार्गावरुन जातात. या मार्गावरुन नानव्हा, सालेगड, पिपरटोला, चिचटोला, सावंगी, बडटोला, ढिमरटोला इत्यादी गावातील लोक ये-जा करतात. त्याचप्रमाणे या परिसरातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा याच मार्गावरुन ये-जा करतात. नेहमी घडत असलेल्या अपघातामुळे या पुलावरुन जाताना जीव मुठीत घेवून चालण्यासारखी परिस्थिती असते. या ठिकाणी अस्तित्वात असलेला पूल दोन्ही बाजूने नाल्याकडे उतार असून पुलाच्या कठड्यावर कोणतेही बॅरिकॅट नाही.या पुलावरुन एकावेळी एकच वाहन जाणे तारेवरीच कसरत असते. एवढ्यात दुसरे वाहन गेले तर अपघाताची शक्यता बळावते. अनेकवेळा संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु याकडे दुर्लक्ष झाले आहे.
आणखी किती बळी जाणार..!
By admin | Updated: March 12, 2015 01:16 IST